‘द वॉल’ अशी ख्याती लाभलेले भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांची टीम इंडियाचे मुख्य कोच म्हणून बुधवारी नियुक्ती झाली. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकानंतर विद्यमान कोच रवी शास्त्री यांचे ते स्थान घेतील.
बीसीसीआयद्वारे नियुक्त सुलक्षणा नाईक आणि आर. पी. सिंग यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने वरिष्ठ पुरुष संघाचे मुख्य कोच म्हणून द्रविड यांची एकमताने नियुक्ती केली. न्यूझीलंडविरुद्ध आगामी स्थानिक मालिकेदरम्यान द्रविड हे पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
शास्त्री यांचा कार्यकाळ विश्वचषकासोबतच संपणार असल्याने बीसीसीआयने २६ ऑक्टोबरपर्यंत या पदासाठी अर्ज मागविले होते. बीसीसीआयने शास्त्री यांच्यासह गोलंदाजी कोच भरत अरुण, फलंदाजी कोच विक्रम राठोड आणि क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर या सर्वांचे उत्तम सेवा दिल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान, सुरू असलेल्या टी २० विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान राहुल द्रविड यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या सामन्यानंतर सामनावीर रोहित शर्मा याला यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याची रिअॅक्शन अशी होती, जी आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेच त्याला यासंदर्भातील सवाल करण्यात आला. त्यावर याची अधिकृत घोषणा झाली का? असा प्रश्न करत आपल्याला याविषयी माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली.
हे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलंय का? आम्ही या ठिकाणी सामना खेळत होतो, त्यामुळे आम्हाला याविषयी समजलं नाही. त्यांच्या नियुक्तीसाठी अभिनंदन आणि त्यांचं टीम इंडियामध्ये पुन्हा स्वागत, परंतु दुसऱ्या भूमिकेत, असं तो म्हणाला.
'राहुल द्रविड हे क्रिकेटमधील दिग्गज नाव आहे आणि भविष्यात त्यांच्या सोबतचा अनुभव उत्तम असेल,' असंही रोहित म्हणाला. बुधवारी अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा मोठ्या फरकानं पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेशाचा थोड्या आशा शिल्लक आहेत.
भारतीय वरिष्ठ पुरुष संघाचे मुख्य कोच या नात्याने राहुल द्रविड यांचे स्वागत आहे. या खेळातील महान खेळाडू आणि महान कारकीर्द असलेले व्यक्तिमत्त्व संघाला लाभले. एनसीएचे प्रमुख म्हणून त्यांनी शेकडो युवा खेळाडू घडविले आहेत. त्यांची नवी कारकीर्द भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून देईल,’ अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिला विजय मिळवताना अफगाणिस्तानचा ६६ धावांनी धुव्वा उडवला. मात्र, धावगती उंचावण्यात यश आल्यानंतरही भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही धुसर आहेत. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत २ बाद २१० धावा कुटल्या. यावेळी धावगती न्यूझीलंड आणि अफगाण संघाहून अधिक करण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला ९९ धावांत रोखणे आवश्यक होते. मात्र त्यांनी २० षटकांत ७ बाद १४४ धावा केल्या.
आतापर्यंत अंतिम संघातून डावलण्यात आलेल्या रविचंद्रन अश्विनने आपली जादू दाखवताना ४ षटकांत केवळ १४ धावा देत २ खंदे फलंदाज बाद केले. मोहम्मद शमीने ३२ धावांत ३ बळी घेत भेदक मारा केला. करिम जनत (४२*) व कर्णधार मोहम्मद नबी (३५) यांनी अफगाणिस्तानकडून झुंज दिली.
त्याआधी, लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी आक्रमण व संयम यांचा योग्य ताळमेळ साधत १४० धावांची सलामी दिली. स्टार गोलंदाज राशिद खानसह सर्वच गोलंदाज दोघांविरुद्ध अपयशी ठरल्याने अफगाण खेळाडू निराश झाले. रोहितने ४७ चेंडूंत ७४ धावा काढताना ८ चौकार व ३ षटकार मारले.
राहुलने ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६९ धावांचा चोप दिला. फटकेबाजीसाठी ॠषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांना बढती मिळाली. ही संधी साधत दोघांनी ६३ धावांची तुफानी भागीदारी केली. पंतने १३ चेंडूंत नाबाद २७ धावा कुटताना एक चौकार व ३ षटकार ठोकले. पांड्याने १३ चेंडूंत नाबाद ३५ धावा चोपत ४ चौकार व २ षटकार मारले. भारतीय संघाला आता आपल्या उर्वरीत दोन सामन्यांतही स्कॉटलंड आणि नामिबियाला मोठ्या अंतराने नमवावे लागेल.