वन डे विश्वचषकात यंदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून पुन्हा एकदा भारत आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीत भिडणार आहेत. २०१९ च्या विश्वचषकात भारताला पराभूत करून फायनलचे तिकिट मिळवण्यात किवी संघाला यश आले होते. मात्र, यंदा भारताची बाजू मजबूत असून टीम इंडिया मायदेशात खेळत आहे.
साखळी फेरीतील सर्व नऊ सामने जिंकून रोहितसेनेने आपला दबदबा निर्माण केला. टीम इंडिया बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. विजेतेपदापासून अवघ्या दोन पावले दूर असलेल्या रोहित ब्रिगेडचा सामना न्यूझीलंडशी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
या सामन्याने सर्वांना २०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीची आठवण करून दिली आहे. भारतीय चाहत्यांना आशा आहे की टीम इंडिया चार वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेईल. अशातच न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरने मोठे वक्तव्य केले आहे.
सध्या सुरू असलेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना करताना भारतीय संघाला चिंता सतावेल, असा विश्वास रॉस टेलरने व्यक्त केला आहे.
चार वर्षांपूर्वी न्यूझीलंडने पावसाने प्रभावित झालेल्या उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पराभव करून २०१९ च्या विश्वचषकातील भारताचे आव्हान संपवले होते. पण इंग्लंडने अंतिम फेरीत किवी संघाला पराभवाची धूळ चारून विश्वचषक उंचावला होता.
२०१९ प्रमाणे यावेळी देखील भारताने साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावून उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेत चांगली सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडने साखळी फेरीत ९ सामन्यांत पाच विजयांसह १० गुणांसह चौथ्या स्थानावर राहून उपांत्य फेरी गाठली आहे.
२०१९ मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाचा भाग असलेला रॉस टेलरने सांगितले की, न्यूझीलंड यंदा देखील उपांत्य फेरीत भारताशी भिडत आहे. पण याची तुलना २०१९ मधील सामन्याशी होऊ शकत नाही. कारण भारत यंदा मायदेशात खेळत आहे.
रॉस टेलर पुढे म्हणाला, 'यावेळी भारत आणखी मोठा दावेदार आहे, कारण ते घरच्या मैदानावर खेळत आहेत आणि लीग स्टेजमध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. पण जेव्हा गमावण्यासारखे काही नसते तेव्हा न्यूझीलंडचा संघ अधिक धोकादायक बनतो. त्यामुळे न्यूझीलंडसमोर टीम इंडिया चिंताग्रस्त होईल.'
'आमच्यासमोर मोठे आव्हान आहे, पण २०१९ मध्येही तेच होते. पावसामुळे तो दोन दिवसांचा सामना झाला होता. आता परिस्थिती वेगळी असून सर्वकाही पाहण्याजोगे असेल', असे टेलरने आणखी सांगितले.