Sachin Tendulkar Birthday: 24 वर्षांपूर्वी सचिनने साजरा केला होता वादळी वाढदिवस, शेन वॉर्ननेही टेकले होते हात...

Sachin Tendulkar Birthday:सचिन तेंडुलकर आज 50 वर्षांचा झाला आहे. आजच्याच दिवशी 1998 मध्ये शारजाह मैदानात सचिनने बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरोधात वादळी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता.

Sachin Tendulkar Birthday: शेन वॉर्नची गणना जगातील महान गोलंदाजांमध्ये केली जाते. शेन वॉर्नसमोर भलेभले फलंदाज फेल व्हायचे, पण सचिन तेंडुलकर एकमेव आहे, ज्याने वॉर्नला खूप त्रास दिला. वॉर्ननेही अनेकदा हे मान्य केले आहे. आता वॉर्न या जगात नाही, पण या दोन खेळाडूंच्या क्रिकेटच्या मैदानावरचे वैर आणि मैत्रीच्या अनेक कहाण्या आहेत.

असाच एक किस्सा 1998 सालचा आहे, तेव्हा शेन वॉर्नच्या स्वप्नातही सचिन यायचा. याची आठवण आज काढण्याचे कारण म्हणजे, आज सचिन 50वर्षांचा झाला आहे. 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत या 'क्रिकेटच्या देवाचा' जन्म झाला. सचिनने 24 वर्षांपूर्वी 1998 साली आपल्या वाढदिवशीच शेन वॉर्नला सळो की पळो करुन सोडलं होतं.

तो दिवस आजही प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या स्मरनात आहे. शेन वॉर्ननेही अनेकदा विविध ठिकाणी त्या दिवसाची आठवण काढली आहे. 24 एप्रिल 1998 मध्ये शारजाहमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोका-कोला कपच्या फायनलमध्ये सचिन नावाचे वादळ आले होते. हे वादळ सर्वात जास्त शेन वॉर्नवर बरसले.

24 एप्रिल 1998 रोजी शारजाहमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोका-कोला कपचा अंतिम सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात सचिनने 131 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांसह 134 धावा केल्या होत्या. सचिनच्या या खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभव करत कोका-कोला कप जिंकला. त्या सामन्यात वॉर्नला 10 षटकात 61 धावा पडल्या होत्या.

सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 272 धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याला प्रत्युत्तर म्हणून टीम इंडियाने हे लक्ष्य 48.3 षटकांत अवघे 4 गडी गमावून पूर्ण केले. सलामीवीर सौरव गांगुली स्वस्तात बाद झाल्यानंतर भारताच्या पुनरागमनाची फारशी आशा नव्हती. मात्र सचिनने कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

त्या शतकी खेळीतील सचिनचा प्रत्येक शॉट आजपर्यंत ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या स्मरणात आहे. खुद्द डॉन ब्रॅडमन यांनी एकदा सांगितले होते की, तेंडुलकर हा एकमेव असा क्रिकेटर आहे ज्याला ऑस्ट्रेलियन संघ नेहमी स्मरणात ठेवेल. 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यातच नव्हे, तर सचिन तेंडुलकरने वर्षभर जोरदार फलंदाजी केली होती.

1998 हे वर्ष त्याच्यासाठी खास होते. त्या वर्षी सचिनने 12 शतके झळकावली होती, तो विक्रम आजही अबाधित आहे. विराट कोहलीने हा विक्रम दोनदा गाठला आहे, त्याने 2017 आणि 2018 मध्ये 11-11 शतके झळकावली आहेत. पण तो सचिनला मागे सोडू शकला नाही. रिकी पाँटिंगने 2003 मध्ये 11 शतके झळकावली होती.

सचिनने भारतासाठी 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि एक टी-20 खेळला आहे. या सर्व फॉर्मेटमध्ये मिळून त्याने 34 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा तो एकमेव खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा आणि सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे.