Arjun Tendulkar Mumbai Indians Sachin Tendulkar : अर्जुनचे सामने पाहायला मी कधीही जात नाही, कारण... - सचिन तेंडुलकर

Mumbai Indians संघाने बोली लावल्यापासून अर्जुनबाबतच्या चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगलेल्या आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गेले काही दिवस चर्चेत आहे. १२ आणि १३ फेब्रुवारीला IPL 2022 च्या हंगामासाठी Mega Auction पार पडलं. त्यात अर्जुन कोणत्या संघाकडे जाणार, याची सर्वांनाच कल्पना होती.

अर्जुनचे नाव येताच Mumbai Indians ने २० लाखांच्या मूळ बोलीवर त्याला विकत घेण्यासाठी ऑक्शन पॅडल उंचावलं. त्यानंतर अनपेक्षितरित्या हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सनेही बोली लावली. अखेर मुंबईने ३० लाखांच्या बोलीवर त्याला आपल्या संघात दाखल करून घेतलं.

आता अर्जुनच्या चाहत्यांना यंदाच्या IPL मध्ये त्याला खेळताना पाहता येईल, अशी अपेक्षा आहे. पण अर्जुनचे वडिल म्हणजे सचिन तेंडुलकर मात्र अर्जुनला खेळताना कधीही पाहत नाही किंवा त्याचे सामने पाहायलाही जात नाही. सचिननेच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला.

"अर्जुनने मुक्तपणे खेळावं आणि क्रिकेटच्या प्रेमात पडावं असं मला वाटतं. त्याला जे हवंय आणि जसं हवंय तसं त्याने करत राहायला हवं. तो सुरूवातीला फुटबॉल खेळायचा. नंतर तो बुद्धीबळ खेळू लागला. क्रिकेट त्याच्या आयुष्यात नंतर आलं", असं सचिनने सांगितलं.

"अर्जुनने क्रिकेट खेळावं यासाठी आम्ही त्याच्या अजिबात मागे लागलो नव्हतो. जर तुम्ही स्वत: एखादी गोष्ट करायची ठरवलीत तर त्यासाठी तुम्ही १०० टक्के मेहनत घेता. गरज पडल्यास काही तडजोडी करायलाही तुम्ही मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे अर्जुन असो किंवा सारा... आम्ही कोणालाही कसलाही फोर्स करत नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू देतो", असेही सचिने स्पष्टपणे नमूद केलं.

"मी अर्जुनला खेळताना कधीही पाहत नाही. मी त्याचे सामनेही पाहायला जात नाही. कारण जेव्हा आपलं मूल मैदानात खेळत असतं तेव्हा त्याचं दडपण आई-वडिलांना नक्कीच असतं. २४ वर्ष मी दडपण काय असतं ते जवळून पाहिलंय. म्हणूनच मी त्याच्या मॅचेसना हजेरी लावत नाही", असं सचिन म्हणाला.

"मला जर अगदीच मोह आवरला नाही तर मी त्याचा सामना लपून पाहतो. त्याला किंवा त्याच्या कोचला न सांगता मी कुठेतरी लपून त्याचा सामना पाहतो. कारण मी असल्याने त्याच्यावर येणारं दडपण मला नकोय", अशी भावना सचिनने व्यक्त केली.