Sachin Tendulkar wife Anjali: भारतीय संघाचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आज ५० वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त आज चहुबाजूंनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. लहानांपासून ते थोरांपर्यंत सारेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिनचे अभिष्टचिंतन करत आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेतली. या गोष्टीला आता दहा वर्ष होत आली. पण तरीही त्याचा चाहतावर्ग कमी झालेला नाही. याउलट सचिनच्या सोशल मीडियावरील नव-नव्या गोष्टींमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये भरच पडताना दिसते.
क्रिकेटमध्ये ४०व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या सचिनने २४ वर्षे क्रिकेट खेळले आणि समृद्ध अशी कारकीर्द घडवली. आपल्या बॅटच्या जोरावर सचिनने तुफान फटकेबाजी केली. सचिनच्या बॅटिंगचे संपूर्ण जग अजूनही फॅन आहे. पण घरात कुणाची बॅटिंग चालते... सचिनची की त्याची पत्नी अंजली हिची? या प्रश्नाचं सचिनने एक मजेशीर उत्तर दिलं.
सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये करियर घडवत असतानाच त्याचे अंजलीशी लग्न झालं. त्यानंतर अंजलीने सचिन क्रिकेटच्या दौऱ्यावर असताना सारा आणि अर्जुन या दोघांचा सांभाळ केला. सचिन त्याबद्दल वेळोवेळी आपल्या मुलाखतींमध्ये बोलला आहे.
नुकताच सचिनने सोशल मीडियावर एक वेगळा प्रयोग करून पाहिला. सचिनने AskSachin नावाच्या हॅशटॅगखाली चाहत्यांशी मुक्तपणे संवाद साधला. या वेळी प्रश्नोत्तरांच्या दरम्यान त्याने अनेक वैयक्तिक स्तरावरील प्रश्नांनाही उत्तर दिले. त्यातच घरात कुणाची बॅटिंग चालते... सचिन की अंजली? अशा आशयाचा एक प्रश्न होता.
घरातील बॅटिंग म्हणजेच, घरातील निर्णय घेण्यात कोण पुढे असते असा प्रश्न सचिनला एका चाहत्याने विचारला. त्यावर सचिनने अतिशय मजेशीर उत्तर दिले. 'घरात कुणाचं राज्य चालतं हा प्रश्नच येत नाही, तुम्ही अंजलीलाच विचारा,' असं अतिशय मिस्कील उत्तर त्याने दिले.