भारताचा माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर याने MI विरुद्ध SRH यांच्यातील यंदाच्या हंगामातील ३३ व्या सामन्यानंतर स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आघाडीच्या १० फलंदाजांची यादी तयार केली आहे. खास गोष्ट ही की, या यादीत विराट कोहलीचे नाव दिसत नाही.
इथं एक नजर टाकुयात टॉप १० फलंदाजांची यादी अन् त्यात विराट कोहलीचं नाव का नाही त्यामागंच कारण..
संजय मांजरेकर याच्या टॉप १० खेळाडूंच्या यादीत चार भारतीयांचा समावेश असून यात प्रियांश आर्य सर्वात आघाडीवर असल्याचे दिसते. हा युवा बॅटर पदार्पणाच्या हंगामात दमदार कामगिरी करताना दिसत आहे.
त्याच्यापाठोपाठ या यादीत पंजाब किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरचा नंब लागतो. अय्यरनं गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात ९७ धावांची नाबाद खेळी केली होती.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंजाब किंग्ज विरुद्ध १४१ धावांची खेळी करणाऱ्या हैदराबादच्या ताफ्यातील अभिषेक शर्माचाही या यादीत समावेश आहे.
याशिवाय दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळतान दिसणाऱ्या केएल राहुलचाही यात समावेश आहे.
परदेशी खेळाडूंच्या यादीत लखनौच्या ताफ्यातील निकोलस पूरन आणि मिचेल मार्श, आरसीबीच्या ताफ्यातील फिल सॉल्ट, सनरायझर्स हैदराबादच्या संघातील ट्रॅविस हेड आणि हेनरिच क्लासेनसह गुजरातकडून खेळणाऱ्या जोस बटलरचा समावेश आहे.
विराट कोहली ६ सामन्यातील ६ डावात ३ अर्धशतकासह २४८ धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. मग तो या यादीत का नाही? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेट महत्त्वाचे आहे, असा दाखला देत माजी क्रिकेटर संजय मांजरेकरने टॉप १० खेळाडूंची यादी तयार केली आहे. विराट कोहलीनं १४३.३५ च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या आहेत. याच कारणामुळे तो या यादीत दिसत नाही.