IND vs SA: संजू सॅमसनने आफ्रिकेला धू धू धुतलं... एक शतक ठोकून केले ५ मोठे विक्रम

Sanju Samson 5 records: संजू सॅमसनने अवघ्या ५० चेंडूत ७ चौकार आणि १० षटकारांसह १०७ धावा कुटल्या.

भारताने पहिल्या टी२० मध्ये दक्षिण आफ्रिकेला ६१ धावांनी पराभूत केले. संजू सॅमसन या सामन्याचा 'हिरो' ठरला. संजू सॅमसनने अवघ्या ५० चेंडूत ७ चौकार आणि १० षटकारांसह १०७ धावा कुटल्या. यासोबतच त्याने ५ मोठे विक्रम केले.

१. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी२० क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा संजू सॅमसन हा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला. तसेच आफ्रिकेविरूद्ध सर्वात जलद तीन आकडी धावसंख्या गाठण्याचा विक्रमही संजू सॅमसनने आपल्या नावे केले.

२. संजू सॅमसन हा आफ्रिकेविरूद्ध भारताकडून सर्वात जलद शतक ठोकणारा फलंदाज ठरला. त्याने ४७ चेंडूत शतक झळकावले. याआधी सूर्यकुमार यादवने ५० चेंडूत शतक ठोकले होते.

३. एका टी२० डावात भारतीयाने सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही संजूने संयुक्तपणे आपल्या नावे केला. संजू सॅमसनने शतकी खेळीत १० षटकार मारले. २०१७ साली श्रीलंकेविरूद्ध रोहित शर्मानेही एका डावात १० षटकार मारले होते.

४. संजू सॅमसनची १०७ ही धावसंख्या भारत-आफ्रिका यांच्यातील आतापर्यंतच्या टी२० सामन्यांमधील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली. याआधी डेव्हिड मिलरने १०६ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती.

५. संजू सॅमसन हा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन शतके ठोकणारा पहिला भारतीय ठरला. बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या टी२० मध्ये त्याने दमदार शतक ठोकले होते. त्यानंतर आफ्रिकेविरूद्ध पहिल्याच सामन्यात त्याने पुन्हा शतक ठोकले.