भारतीय संघाला आज पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. २००३ पासून टीम इंडियाला आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवता आलेला नाही आणि आजही तेच घडले. भारताला ७ बाद ११० धावाच करता आल्या आणि न्यूझीलंडनं हे लक्ष्य सहज पार केलं. सलग दुसऱ्या पराभवामुळे टीम इंडियाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग आणखी खडतर बनला आहे, परंतु संपलेला नाही.
न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियानं इशान किशन व लोकेश राहुल या जोडीचा प्रयोग केला, परंतु तो फसला. रोहित शर्माला जीवदान मिळूनही काही खास करता आले नाही. कर्णधार विराट कोहली व रिषभ पंत यांनी दडपणात विकेट फेकल्या. हार्दिक पांड्या २३ व रवींद्र जडेजा नाबाद २६ धावा करून संघाला ७ बाद ११० धावांपर्यंत मजल मारून दिली. ट्रेंट बोल्ट ( ३-२०), इश सोढी ( २-१७) यांच्यासह टीम साऊदी ( १-२६), अॅडम मिल्ने ( १-३०) यांनीही चांगली गोलंदाजी केली.
न्यूझीलंडनं डॅरील मिचेलनं ४९ धावा करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. केन विलियम्सन ३३ धावांवर नाबाद राहिला आणि मार्टीन गुप्तील २० धावांवर बाद झाला. भारतासाठी दोन्ही विकेट्स जसप्रीत बुमराहनं घेतल्या.
पाकिस्ताननं तीन विजय मिळवून ६ गुण व ०.६३८ नेट रन रेटसह गटात अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. दुसऱ्या स्थानासाठी आजचा सामना महत्त्वाचा होता आणि त्यात न्यूझीलंडनं बाजी मारून त्यांचे आव्हान कायम राखले. पण, त्यांच्या मार्गातही अफगाणिस्तानचा अडथळा आहे.
अफगाणिस्तानं ३ पैकी दोन सामने जिंकून ४ गुण व ३.०९७ नेट रन रेटसह दुसरे स्थान पक्के केले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या पुढील कामगिरीवर टीम इंडियाचे भवितव्य अवलंबून आहे. अफगाणिस्तान आता उर्वरीत दोन सामन्यांत न्यूझीलंड व टीम इंडियाशी भिडणार आहे. न्यूझीलंडच्या खात्यात २ गुण असून ०.७६५ नेट रन रेटसह ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारताला आता उर्वरीत सामन्यांत अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया यांच्याविरुद्ध अनुक्रमे ८०+, १००+ आणि १००+ धावांच्या फरकानं विजय मिळवावा लागेल
अफगाणिस्ताननं ७ नोव्हेंबरला न्यूझीलंडला हरवल्यास आणि न्यूझीलंडनं स्कॉटलंड व नामिबाय यांच्याविरुद्ध ५०+ धावांच्या फरकानं विजय मिळवल्यास नेट रन रेटच्या जोरावर भारत आघाडी घेऊ शकतो