Join us  

Shahid Afridi: "...तर भारताची हिम्मत झाली नसती", आशिया कपच्या मुद्द्यावरून आफ्रिदीचा पाकला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 1:50 PM

Open in App
1 / 11

आशिया चषक 2023 च्या संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात वाद सुरू आहे. आगामी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे, मात्र भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे.

2 / 11

बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी मागील वर्षाच्या अखेरीस यावर बीसीसीआयची भूमिका जाहीर केली होती. तसेच आशिया चषकाची स्पर्धा एखाद्या तटस्थ ठिकाणी खेळवावी अशी मागणी देखील शाह यांनी केली आहे.

3 / 11

बीसीसीआयच्या या पवित्र्यानंतर पीसीबीने एक लांबलचक पत्रक काढून बीसीसीआयवर निशाणा साधला होता. याशिवाय भारत आशिया चषकासाठी पाकिस्तानात आला नाही तर, आम्ही देखील भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकू अशी धमकी दिली होती.

4 / 11

या धमकीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात अनेक बदल झाले. तत्कालीन पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडून बीसीसीआयचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.

5 / 11

मात्र, पीसीबीचे माजी अध्यक्ष असलेल्या राजा यांना यश आले नाही. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची सूत्रे नसीम सेठी यांच्या हाती आहेत. त्यांनी कारभार सांभाळताच अनेक फेरबदल करून बीसीसीआयला डिवचण्याचा प्रयत्न केला.

6 / 11

भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही तर आम्ही देखील भारतात जाणार नसल्याचे सेठी यांनी म्हटले. यावरून भारत आणि शेजारील देशातील माजी खेळाडूंमध्ये वाद रंगला आहे.

7 / 11

अलीकडेच पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदादने खालच्या दर्जाची टीका करून भारताला डिवचले होते. त्याला भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने तीव्र शब्दांत उत्तर दिले.

8 / 11

2023 मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे धाडस पाकिस्तानमध्ये नाही, अशा शब्दांत रविचंद्रन अश्विनने प्रत्युत्तर दिले.

9 / 11

आता पाकिस्तानी संघाचा दिग्गज माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने या वादात उडी घेत सावध पवित्रा घेतला आहे. भारताची मजबूत बाजू असल्यामुळे आपण काय बोलू शकत नाही अशी मवाळ भूमिका आफ्रिदीने घेतली.

10 / 11

अश्विनच्या विधानावर बोलताना आफ्रिदीने म्हटले, 'जर एखादा देश आपल्या पायावर उभा नसेल तर त्यांच्यासाठी निर्णय घेणे एवढे सोपे नसते. भारत एका मजबूत स्थितीत आहे, त्यामुळे ते अशा शब्दांत बोलत आहेत. ते जर मजबूत स्थितीत नसते तर त्यांची हिम्मत झाली नसती', असे आफ्रिदीने पाकिस्तानातील वृत्तवाहिनी समा टीव्हीशी बोलताना म्हटले.

11 / 11

'आशिया चषकाच्या यजमानपदाच्या वादात आयसीसीची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. पण आयसीसी भारतीय क्रिकेट बोर्डासमोर काहीच करू शकत नाही', अशा शब्दांत शाहिद आफ्रिदीने आशिया चषकाच्या मुद्द्यावरून नकळत पाकिस्तानलाच घरचा आहेर दिला.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानएशिया कप 2022बीसीसीआयशाहिद अफ्रिदीपाकिस्तानजय शाह
Open in App