सध्या कतारच्या धरतीवर लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे. कतारमधील दोहा येथे भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिजसह जगभरातील निवृत्त क्रिकेटपटू पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर खेळत आहेत.
या स्पर्धेसाठी पाकिस्तानचे देखील अनेक दिग्गज क्रिकेटपटू कतारला गेले आहेत. मिस्बाह उल हक, शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर आणि अब्दुल रझाक हे माजी स्टार खेळाडू आशिया लायन्सच्या संघाचा भाग आहेत.
आशिया लायन्सच्या संघाची कमान शाहिद आफ्रिदीच्या खांद्यावर आहे. लायन्सने आतापर्यंत तीनपैकी 2 सामने जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे.
गौतम गंभीरच्या नेतृत्वातील इंडिया महाराजाकडून शाहिद आफ्रिदीच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. आज आशिया लायन्सचा सामना वर्ल्ड जायंट्सशी होणार आहे.
या सामन्याआधी शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये शाहिद आफ्रिदी त्याची खिल्ली उडवत आहे. याशिवाय ही व्हिडीओ एडिट न करण्याचा सल्ला देखील आफ्रिदीने दिला आहे.
खरं तर इंडिया महाराजाकडून पराभव झाल्यानंतर शोएबने हा व्हिडीओ पोस्ट केला. त्या दिवशी आशिया लायन्सचे खेळाडू फिरायला गेले होते. दोहा येथील एका रेस्टॉरंटमध्ये मिस्बाह उलहक आणि सोहेल तन्वीर शाहिद आफ्रिदीसोबत वेळ घालवत होते.
दरम्यान, माजी क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय संघात खेळलेल्या आठवणींना उजाळा देत एकमेकांची खिल्ली उडवली. व्हिडीओच्या सुरुवातीला आफ्रिदीने अख्तरवर निशाणा साधला.
खरं तर शोएब अख्तर म्हणाला होता की, 'बाबर हा पाकिस्तानमध्ये ब्रँड नाही कारण त्याला इंग्रजी भाषा बोलण्यात अडचण येत आहे.' यानंतर शोएबवर बरीच टीका झाली. या मुद्द्यावर बोलताना आफ्रिदीने व्हिडीओमध्ये अख्तरची खिल्ली उडवली.
शाहिद आफ्रिदीने अख्तरची खिल्ली उडवताना म्हटले, 'मला वाटते की, इश्क दार (पाकिस्तानचे अर्थमंत्री) यांना काढून टाकायला हवे आणि शोएब अख्तरला पाकिस्तानचा अर्थमंत्री बनवायला हवे. कारण तो काहीही करू शकतो, त्याला ब्रँड करायला येतो त्यामुळे तो ब्रँड बनवेल.'
यानंतर शाहिदने शोएबला धमकी दिली की, तू व्हिडीओ एडिट केलीस तर तुझं काय खरं नाही. एकूणच शाहिद आफ्रिदीने शोएब अख्तरच्या सततच्या व्हिडीओवरून त्याची खिल्ली उडवली.