Shane Warne Death Case: रक्ताचे डाग, जर्मन महिला अन् आता मसाज गर्ल; शेन वॉर्न प्रकरणात नेमकं काय-काय घडलं?

याप्रकरणी आतापर्यंत अनेक अपडेट्स आले असून पोलीस तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. वॉर्नचे थायलंडमधील अका बंगल्यात निधन झाले, तो तेथे फिरण्यासाठी गेला होता. याप्रकरणी आतापर्यंत अनेक अपडेट्स आले असून पोलीस तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. शेन वॉर्नच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणांत आतापर्यंत काय घडले जाणून घ्या...

गेल्या 4 मार्चला शेन वॉर्नचा मृत्यू झाला, तो थायलंडमधील एका बंगल्यावर थांबलेला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. थायलंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्नला अॅटॅक आला, तेव्हा त्याच्या सोबत असलेल्या लोकांनी त्याला सीपीआर दिला होता. या दरम्यान, वॉर्नच्या तोंडातून रक्तही आले होते. याचे डागही त्याच्या रूममध्ये आढळून आले.

थायलंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्नला रुग्णवाहिकेतून नेत असतानाच त्याचा मृत्यू झालेला होता. यामुळे रुग्णालयात पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. याच रुग्णवाहिकेजवळ एक जर्मन महिलाही उभी होती. थायलंड पोलिसांनी या महिलेचीही चौकशी केली. ती शेन वॉर्नची फॅन होती.

याशिवाय, शेन वॉर्नच्या व्हिलातील काही सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती आले आहेत. शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वी काही महिला व्हिलामध्ये आल्या होत्या, त्यांना मसाजसाठी बोलावण्यात आले होते, असे समोर आले आहे. शेन वॉर्न आणि त्याच्या मित्रांनी या महिलांना बोलावले होते.

यातीलच एका महिलेने खुलासा केला होता की, ती जेव्हा शेन वॉर्नच्या रूमजवळ गेली, तेव्हा कसल्याही प्रकारचा आवाज येत नव्हता. शेन वॉर्नचा कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही. यावर तिने तिच्या बॉसलाही कळवले होते.

सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेले आहे की, शेन वॉर्नच्या मृत्यूची माहिती मिळाली, तेव्हा चार महिला रिसॉर्टमधून बाहेर पडत होत्या. यातील दोन महिला शेन वॉर्नच्या मित्रांची मसाज करत होत्या. मात्र, शेन वॉर्नपर्यंत एकही महिला पोहोचू शकली नव्हती.

या सर्व गोष्टींवरून थायलंड पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, शेन वॉर्नच्या मृत्यूत कसल्याही प्रकारची गडबड झाल्याचे आढळून आलेले नाही. तसेच पोस्टमॉर्टमच्या अहवालातही त्याच्या मृत्यूचे कारण हार्ट अॅटॅक असल्याचेच सांगण्यात आले आहे, असेही पोलिसांनी म्हटले आहे.