Shane Warne Last Instagram Post : शेन वॉर्नच्या मनात नक्की काय होतं? त्याने स्वत:लाच कशासाठी दिला होता जुलैपर्यंतचा वेळ?

शेन वॉर्नचं ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचं शुक्रवारी सायंकाळी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५२ वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या अकाली मृत्यूने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला.

शेन वॉर्न हा सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक होता यात दुमतच नाही. शेन वॉर्नने आपल्या कारकिर्दीत ७०८ कसोटी विकेट्स आणि २९३ वन डे विकेट्स घेत एकूण १,००१ बळी टिपले.

शेन वॉर्न हा फिरकीचा जादुगार होता. २८ वर्षांपूर्वी मॅन्चेस्टरमध्ये इंग्लंड विरुद्धच्या अॅशेस मालिकेत इंग्लंडचा फलंदाज माइक गॅटिंगला शेन वॉर्नने फिरकीच्या जाळ्यात अडकवलं होतं. तो चेंडू 'बॉल ऑफ द सेंच्युरी' ठरला होता.

शेन वॉर्नच्या निधनाचं साऱ्यांनाच दु:ख झालं. शेन वॉर्नचा मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी आणि मैदानाबाहेरील खास मित्र मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ट्वीट करून भावनांना वाट मोकळी करून दिली. 'वॉर्नी, तू आमच्यातून खूप लवकर निघून गेलास', असं त्यानं लिहिलं.

केवळ क्रीडाक्षेत्रच नव्हे तर सर्वच स्तरातून शेन वॉर्नच्या निधनाबाबत शोक व्यक्त करण्यात आला. BCCIचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही वॉर्नच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं. क्रिकेटमधला सर्वकालीन महान नायक गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शेन वॉर्नचं अचानक निधन झालं. त्यानंतर त्याची इन्स्टाग्रामवरील शेवटची पोस्ट चांगलीच चर्चेत आली. त्या पोस्ट मध्ये त्याने स्वत:लाच जुलैपर्यंतचा वेळ दिला होता. त्यामुळे त्याच्या मनात नक्की काय सुरू होतं, अशी काहींनी चर्चा केल्याचं दिसून आलं.

शेन वॉर्न आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या वेळी एक अतिशय फिटनेसप्रेमी आणि तंदुरूस्त खेळाडू म्हणून ओळखला जात होता. पण निवृत्तीनंतर कालांतराने शेन वॉर्न थोडा स्थूल झाला होता.

कोणत्याही खेळाडूला फिटनेसचं महत्त्व दुसऱ्या कोणीही समाजवून सांगावं लागत नाही. निरोगी आणि तंदुरूस्त राहण्याच्या दृष्टीने शेन वॉर्ननेही एका खास कारणास्तव स्वत:ला जुलैपर्यंतचा वेळ दिला होता.

आपला काही वर्षांपूर्वीचा सिक्स पॅक अँब्स वाला एक फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं की फिटनेसच्या दृष्टीने मी पाऊल पुढे टाकलं आहे. आता जुलैपर्यंत मी या फोटोत होतो तसा होणार आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. पण निधनाच्या ४ दिवस आधी केलेली पोस्ट त्याच्या आयुष्यातील शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट ठरली.