Shikhar Dhawan: फेसबुकवर मैत्री, नंतर प्रेम, आता इन्स्टाग्रामवर झाली अखेर, अशी होती शिखर-आएशाची लव्हस्टोरी

Shikhar Dhawan Divorce News:

भारताचा आघाडीचा सलामीवीर शिखर धवन आणि आएशा मुखर्जी यांच्या घटस्फोटाच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. शिखर आणि आएशाची जोडी नऊ वर्षे एकत्र राहिल्यानंतर विभक्त झाली आहे. घटस्फोटाच्या वृत्तावर शिखर धवनकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र आएशा मुखर्जी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करण्यात आलेल्या पोस्टमुळे खूप काही स्पष्ट झाले आहे.

फेसबुकच्या माध्यमातून सुरू झालेल्या शिखर आणि आएशा यांच्यातील लव्हस्टोरीच्या शेवटाची माहिती इन्स्टाग्रामवरून मिळेल, अशा कुणी विचारही केला नव्हता. या जोडप्याने २०१२ मध्ये विवाह केला होता. तसेच त्यांना २०१४ मध्ये जोरावर हा मुलगा झाला. हे दोघेही त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये जेवढे साधे दिसायचे तेवढीच त्यांची लव्हस्टोरी होती.

फेसबुकवर एका पंजाबी तरुणाने बंगाली तरुणीला पाहिल्यावर तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर धवनने कुणाचीही पर्वा न करता त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या आणि दोन मुलांची आई असलेल्या आएशाला आपली पत्नी बनवले.

आएशाचे कुटुंब ऑस्ट्रेलियात राहते. तिचे वडील बंगाली आणि आई ब्रिटीश आहे. पेशाने किक बॉक्सर असलेल्या आएशाचे हे दुसरे लग्न होते. दोघांचीही ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती.

एके दिवशी शिखर धवन आणि हरभजन सिंग एकत्र असताना हरभजनच्या अकाऊंटवर शिखरने आएशाला पाहिले होते. त्यानंतर त्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दोघेही एकमेकांचे मित्र बनले. त्यांच्यात बोलणे सुरू झाले. त्याचदरम्यान ते एकमेंकांच्या प्रेमात पडले.

बरेच दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर धवनने आएशाला प्रपोझ केले होते. सुरुवातीला धवनचे कुटुंबीय या नात्यासाठी राजी नव्हते. आएशाचे वय, ती घटस्फोटित असणे आणि ती दोन मुलांची आई असणे हे त्यामागचे कारण होते. मात्र धवनने या नात्यासाठी कुटुंबीयांचे मन वळवले.

त्यानंतर २०१२ मध्ये शिखर धवन आणि आएशा मुखर्जी यांनी लग्न केले. तसेच धवनने आएशाच्या दोन्ही मुलींना आपले नाव दिले. तसेच तो त्यांच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवत असे.