IND vs SL: "जेव्हा जेव्हा वाईट वेळ आली तेव्हा राहुल द्रविडनं तारलं", विजयानंतर शिवम मावीचा खुलासा

Shivam Mavi: शिवम मावीने पदार्पणाच्या सामन्यातच 4 बळी घेऊन सामना अविस्मरणीय केला.

भारतीय संघ मायदेशात श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून यजमान संघाने नववर्षातील आपली सुरूवात विजयाने केली.

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात हार्दिक सेनेने 2 धावांनी विजय मिळवला. भारताचा युवा गोलंदाज शिवम मावीने आपल्या पदार्पणाचा सामना अविस्मरणीय करत 4 षटकांत 22 धावा देऊन 4 बळी घेतले.

पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताचे सलामीवीर ईशान किशन आणि शुबमन गिल यांनी साजेशी सुरूवात केली. किशनने ताबडतोब खेळी करून पाहुण्या संघावर दबाव टाकला. मात्र, पदार्पणाचा सामना खेळत असलेला गिल स्वस्तात माघारी परतला.

त्यानंतर सूर्यकुमार यादव (7), संजू सॅमसन (5), हार्दिक पांड्या (29), ईशान किशन (37) धावा करून बाद झाले. पण दिपक हुडा (नाबाद 41) आणि अक्षर पटेल (नाबाद 31) यांनी शानदार खेळी करून श्रीलंकेसमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले.

पहिल्या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या शिवम मावीने 4 बळी घेऊन सामना अविस्मरणीय केला. शानदार कामगिरीनंतर शिवम मावीने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षर राहुल द्रविड यांचे कौतुक केले असून त्यांनी मला आधार दिल्याचे म्हटले आहे.

बीसीसीआयने मावीच्या संभाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो म्हणाला, "कठीण काळात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना बरेच काही शिकलो आहे. ते 2018 मध्ये अंडर-19 विश्वचषक संघातही सोबत होते. भविष्यातही त्यांच्याकडून काही आवश्यक टिप्स घेत राहीन."

यादरम्यान त्याने आपल्या भारतीय संघासोबतच्या पहिल्या सराव सत्राबद्दलही भाष्य केले. मावीने सांगितले की, या 6 वर्षांत त्याने आपल्या फलंदाजीवरही काम केले आहे. भारतीय संघातील आपल्या समावेशाबाबत तो म्हणाला की, आधी विश्वास बसत नव्हता पण नंतर ही बातमी आपल्या कुटुंबीयांना शेअर केली. ते माझ्यापेक्षा जास्त आनंदी होते.

पहिल्या सामन्यात विजय मिळवून यजमान संघाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती.

मात्र, सांघिक खेळीच्या जोरावर पाहुण्या संघाने सामन्यात रंगत आणली. पाहुण्या संघाकडून कर्णधार दासुन शनाकाने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. पण त्याला उमरान मलिकने बाद केले आणि श्रीलंकेला मोठा धक्का दिला.

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर भारताने 2 धावा राखून विजय मिळवला. कर्णधार हार्दिक पांड्याने धाडसी निर्णय घेत अखेरचे षटक अक्षर पटेलला दिले होते. मात्र, अक्षर पटेलने अखेरच्या षटकात 1 षटकार वगळता शानदार गोलंदाजी केली आणि भारताला विजय मिळवून दिला.