T20 World Cup: "मी तिथे असतो तर पाकिस्तानसाठी मरून हिरो झालो असतो", शोएब अख्तरने शाहीन आफ्रिदीचे टोचले कान

Shoaib Akhtar slams shaheen afridi: पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने विश्वचषकाच्या फायनलचा दाखला देत शाहीन आफ्रिदीवर टीकास्त्र सोडले आहे.

2022 च्या ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीला अंतिम सामन्यात दुखापत झाली होती. या दुखापतीमुळेच पाकिस्तान संघ किताब जिंकू शकला नाही अशी चर्चा पाकिस्तानी चाहत्यांमध्ये आहे.

दुखापतीमुळे शाहीनला गोलंदाजी करता आली नाही. मात्र, शाहीनने मैदान सोडायला नको हवे होते असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले आहे.

शाहीनच्या जागी मी असतो तर पाकिस्तानसाठी मरून पण उरलेली 2 षटके टाकली असती असे अख्तरने अधिक सांगितले.

शोएब अख्तरने अप्रत्यक्षपणे शाहीन आफ्रिदीवर निशाणा साधला आहे. शोएब अख्तरने एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, शाहीन आफ्रिदीला ट्वेंटी-20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानचा सुपरस्टार बनण्याची संधी होती, जी त्याने गमावली.

"शाहीनच्या जागी मी असतो तर न झुकता सामना अखेरपर्यंत खेळला असता. याशिवाय गुडघे नंतर दुरुस्त केले जाऊ शकतात, परंतु तो क्षण परत येणार नाही, अशा शब्दांत अख्तरने शाहीन आफ्रिदीवर टीकास्त्र सोडले आहे.

शोएब अख्तर म्हणाला की, "जर मी शाहीन आफ्रिदी असतो तर मी पाकिस्तानसाठी ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये माझ्या गुडघ्यात इंजेक्शन घेतले असते. मी पेनकिलर घेऊन दोन षटके टाकली असती, मी खाली पडेन, पुन्हा उठेन, पुन्हा पडेन, पुन्हा उठेन. पण तरीदेखील गोलंदाजी केली असती."

तसेच जर मी शाहीन आफ्रिदीच्या जागी असतो तर, ते 12 मिनिटे आणि त्या 12 चेंडूंनी मी जगातील सर्वात मोठा पाकिस्तानी सेलिब्रिटी बनलो असतो. मी राष्ट्रीय नायक बनलो असतो, असे अख्तरने सांगितले.

याशिवाय मी एक चेंडू टाकला असता, पुन्हा पडलो असतो, गुडघा मोडला असता. मला वेदना होत असतील माझ्या तोंडातून रक्त येत असते. पण मी पुन्हा उभा राहिलो असतो, गुडघ्याला इंजेक्शन दिले असते पण माझी गोलंदाजी पूर्ण केली असती, अशा शब्दांत अख्तरने शाहीनचा समाचार घेतला.

शोएब अख्तरने आणखी म्हटले की, "लोक म्हणतील की तुमचा अंत होईल. गुडघा मोडेल. मरणार नाही पण मी म्हणेन की अशा वेळी मरण पत्करलेले बरे, पण विश्वचषक जाऊ नये."

शाहीनच्या दुखापतीचा हा तो क्षण होता जेव्हा तो सुपरस्टार होऊ शकला असता. पण अशावेळी शाहीनच्या जागी मी असतो तर मरण पत्करून पाकिस्तानचा राष्ट्रीय नायक झालो असतो असे शोएब अख्तरने स्पष्ट केले.