शुबमन गिलचे ऐतिहासिक शतक! १२९ धावांच्या खेळीने मोडले ५ मोठे विक्रम

शुबमन गिलने ( Shubman Gill) आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. मागील चार डावांतील तिसरे शतक झळकावताना त्याने गुजरात टायटन्सला २३३ धावांपर्यंत नेले. शुबमन ६० चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांसह १२९ धावांवर झेलबाद झाला.

शुबमनने नववी धाव पूर्ण करून ऑरेंज कॅप नावावर केली. त्याच्या ८५१* धावा झाल्या आहेत. RCBच्या फॅफ ड्यू प्लेसिसला ( ७३०) गिलने आज मागे टाकले. विराट कोहली ( ६३९), यशस्वी जैस्वाल ( ६३५) आणि डेव्हॉन कॉनवे ( ६२५) हे यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाजांमध्ये आहेत.

शुबमनने अहमदाबादमध्ये ४५२+ धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएलच्या एका पर्वात एकाच मैदानावर ४००+ धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. विराट कोहलीने बंगळुरूत २०१६ मध्ये ५९७, ख्रिस गेलने २०१३मध्ये बंगळुरूवर ५३२ आणि डेव्हिड वॉर्नरने २०१९मध्ये हैदराबादवर ४३३ धावा केल्या होत्या.

आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये शुबमनने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. त्याने यंदाच्या पर्वात ८५१* धावा केल्या आहेत. या विक्रमात विराट कोहली २०१६मध्ये सर्वाधिक ९७३ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर २०२२ मध्ये जॉस बटलर ( ८६३) आणि २०१६मध्ये डेव्हिड वॉर्नर ( ८४८) यांचा क्रमांक येतो.

शुबमन गिलने आज प्ले ऑफमध्ये सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम मोडला. त्याने १२३ धावा ओलांडताच वीरेंद्र सेहवागच्या नावावर असलेल्या १२२ ( PBKS vs CSK, 2014) धावांचा विक्रम मोडला. शेन वॉटसनने २०१८मध्ये हैदराबादविरुद्ध ११७*, वृद्धीमान साहाने २०१४ मध्ये KKR विरुद्ध ११५* धावा केल्या.

आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजाकडून ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. लोकेश राहुलने ( PBKS vs RCB) २०२० मध्ये नाबाद १३२ धावा केल्या होत्या. ३ धावांनी गीलचा हा विक्रम हुकला. पण, त्याने रिषभ पंतचा ( DC vs SRH) २०१८सालचा १२८* धावांचा विक्रम मोडला.