भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दोन संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिली कसोटी जिंकून भारताने १-०ची आघाडी घेतली आहे. तर दुसरी कसोटी ६ डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची १९४७-४८ सालच्या कसोटी दौऱ्यात वापरलेल्या टोपीचा लिलाव करण्यात आला.
ब्रॅडमन यांनी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान प्रतिष्ठित 'बॅगी ग्रीन' कॅप (ऑस्ट्रेलियन कसोटी संघाची टोपी) परिधान केली होती. ही टोपी जवळपास ८० वर्षे जुनी असून ती त्यांची घरच्या मैदानावरील अखेरची मालिकाही ठरली होती.
सर डॉन ब्रॅडमन यांनी भारताविरुद्धच्या त्या मालिकेत सहा डावांमध्ये १७८.७५च्या सरासरीने ७१५ धावा कुटताना तीन शतके आणि एक द्विशतक ठोकले. या जोरावर ऑस्ट्रेलियाने ती मालिका ४-० अशी जिंकली होती.
ब्रॅडमन यांच्या या टोपीचा नुकताच लिलाव करण्यात आला. लिलावा दरम्यान ही टोपी धुळीमुळे काहीशी जुनाट दिसून आली. तसेच, या टोपीच्या कडाही काहीशा घासलेल्या असल्याचे दिसून आले.
असे असूनबी या टोपीला लिलावात तब्बल २ कोटी ६३ लाखांची बोली लागली. लिलाव करणाऱ्या 'बोनहम्स'च्या माहितीनुसार, टोपीला आधी २ कोटी १४ लाखांमध्ये खरेदी करण्यात आले. नंतर त्यात खरेदीचे प्रीमियम शुल्क जोडण्यात आले.