SL vs PAK 1st Test : पाकिस्तानमुळे टीम इंडिया कसोटी वर्ल्ड कप फायनल नाही खेळू शकणार; श्रीलंकेवर मिळवला ऐतिहासिक विजय

WTC Standings SL vs PAK 1st Test : पाकिस्तान संघाने Galle कसोटीत ऐतिहासिक कमगिरी केली आहे. श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी कमालिची चुरशीची झाली.

WTC Standings SL vs PAK 1st Test : पाकिस्तान संघाने Galle कसोटीत ऐतिहासिक कमगिरी केली आहे. श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी कमालिची चुरशीची झाली. 342 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने दुसऱ्या डावात दमदार सुरुवात केली. पण, अखेरच्या 39 धावा हव्या असताना 6वी विकेट पडली अन् श्रीलंका पुनरागमन करणार असे चित्र दिसत होते.

पाकिस्तानचा 22 वर्षीय सलामीवीर अब्दुल्लाह शफिकने अखेरपर्यंत झुंज दिली. त्याने 408 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 160 धाव करून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. Galle वर कसोटीच्या चौथ्या डावात 300+ धावांचा यशस्वी पाठलाग करणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ ठरला.

पाकिस्तानच्या या विक्रमांचा टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे. आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) अंतिम फेरीत भारताला जाणे अजून अवघड झाले आहे.

श्रीलंकेच्या पहिल्या डावातील 222 धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची अवस्थान दयनीय झाली होती, परंतु कर्णधार बाबर आजमने शतकी खेळी करून संघाला 218 धावांपर्यंत मजल मारून दिली. श्रीलंकेने दुसऱ्या डावात 337 धावा करून पाकिस्तानसमोर विजयासाठी 342 धावांचे लक्ष्य ठेवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर इमाम-उल-हक व अब्दुल्लाह शफिक यांनी पहिल्या विकेटसाटी 87 धावांची मजबूत भागीदारी केली. इमाम-उल-हक 73 चेंडूंत 35 धावांवर स्टम्पिंग झाला. अझर अली ( 6) बाद झाला. कर्णधार बाबर व सलामीवीर शफिक यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. बाबर 55 धावांवर बाद झाला. मोहम्मद रिझवाननेही 40 धावा केल्या. रिझवाननंतर अघा सलमान ( 12) व हसन अली ( 5) हे झटपट माघारी परतल्याने पाकिस्तानसमोरील अडचणी वाढल्या.

अब्दुल्लाहने खिंड लढवली व पाकिस्तानला 4 विकेट्स राखून विजय मिळवून देताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पाकिस्तानला विजयासाठी 19 धावांची गरज असताना अब्दुल्लाहचा झेल सोडल्याचा फटका यजमानांना बसला.

विजयी कसोटीत पाकिस्तानकडून चौथ्या डावातील ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. याआधी युनिस खानने 2015मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 171 धावा केल्या होत्या. पण, चौथ्या डावात 400+ चेंडूंचा सामना करणारा अब्दुल्लाह हा जगातील पहिलाच सलामीवीर ठरला. यापूर्वी न्यूझीलंडच्या जी टर्नर यांनी 1974मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 355 चेंडूंचा सामना करताना नाबाद 110 धावा केल्या होत्या.

पाकिस्तानने या विजयामुळे WTC 2021-23 points table मध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या. आता दक्षिण आफ्रिका 71.43 टक्क्यांसह अव्वल, तर ऑस्ट्रेलिया 70 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचे 58.33 टक्के झाले असून भारत 52.08 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. भारताला अजून 6 कसोटी ( दोन बांगलादेश व 4 ऑस्ट्रेलिया) सामने खेळायचे आहेत आणि आता ते जिंकूनही WTC Final मध्ये त्यांना प्रवेश मिळेल, याची शक्यता मावळली आहे.