Smriti Mandhana : WPL 2023 मध्ये RCBला अद्यापही विजयाचे खाते उघडणे शक्य झालेले नाही. आज झालेल्या दिल्लीविरूद्धच्या सामन्यात स्मृती मंधानाच्या RCB संघाला ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला.
एलिस पेरीच्या (Ellyse Perry) दमदार अर्धशतकाच्या जोरावर (नाबाद ६७) बंगळुरूने ४ बाद १५० धावांपर्यंत मजल मारली. रिचा घोष हिनेदेखील १६ चेंडूत ३७ धावांची छोटी पण उपयुक्त खेळी केली.
RCBच्या गोलंदाजांना मात्र भारताचा हा सामना आपल्या बाजूने झुकवता आला नाही. अलिस कॅप्सी (३८), जेमिमा रॉड्रीग्ज (३२) आणि मेरीझान काप (नाबाद ३२) यांनी दिल्लीला विजय मिळवून दिला.
RCBचा हा स्पर्धेतील सलग पाचवा पराभव ठरला. त्यामुळे हताश झालेली स्मृती मंधाना म्हणाली- 'एलिस पेरी आणि रिचा घोष दोघींनी उत्तम फलंदाजी केली. त्यांच्या फलंदाजीच्या जोरावरच आम्ही १५० पार मजल मारली आणि संघर्ष करता येईल अशी धावसंख्या गाठली.'
'फलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे आम्हाला एक असा स्कोअर मिळाला होता, ज्याचा आम्हाला बचाव करता यायला हवा होता. आमच्या गोलंदाजांनी सुरूवातीच्या काही षटकांमध्ये जी कामगिरी केली, त्या दृष्टीने आम्ही चांगली गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाही.'
'बंगळुरूच्या गोलंदाजांनी खरंच चांगली कामगिरी केली. मला त्यांच्या कामगिरीत सुधारणा पाहायला मिळाली. पण अखेर आम्ही कमी पडलो,' अशी प्रामाणिक कबुली स्मृती मंधानाने पाचव्या पराभवानंतर दिली.