IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादची झाली धुलाई अन् दुसरीकडे 'खऱ्या' कर्णधाराने कुटल्या २४ चेंडूंत ११० धावा

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज यजमान सनरायझर्स हैदरादाबची बेक्कार धुलाई झाली.. तेच दुसरीकडे त्यांच्या खऱ्या कर्णधाराने १७५ धावांची वादळी खेळी केली.

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज यजमान सनरायझर्स हैदरादाबची बेक्कार धुलाई झाली.. राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलर, संजू सॅमसन व यशस्वी जैस्वाल यांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताना २० षटकांत २०३ धावांचे तगडे आव्हान उभे केले. IPL 2023 मध्ये २००+ धावा करणारा RR हा पहिला संघ ठरला.

आजच्या सामन्यात SRH चे नेतृत्व भुवनेश्वर कुमार करताना पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. SRH ने यंदाच्या पर्वात कर्णधारपदी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम ( Aiden Markram ) याच्या नावाची घोषणा केली आहे. असे असतानाही भुवी कर्णधार कसा, हा सर्वांना प्रश्न पडला. पण, त्याचे उत्तर मार्करामने मैदानावरील स्फोटक खेळीतून दिले.

दक्षिण आफ्रिकेचा संघ नेदरलँड्सविरुद्ध वन डे मालिका खेळतोय आणि त्यामुळे SRH च्या आजच्या सामन्यात मार्कराम अनुपस्थित आहे. सनरायझर्स हैदराबादने मागील पर्वात केन विलियम्सन, निकोलस पूरन यांना संघातून रिलीज केले. त्यानंतर कर्णधारपदी मार्करामची निवड केली गेली.

एडन मार्करामने एकूण १०७ ट्वेंटी-२० सामन्यांत २७७० धावा आणि २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आज नेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात वादळी खेळी केली. आफ्रिकेसाठी ही मालिकात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची मुख्य फेरी मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच आफ्रिकेचे खेळाडू IPL 2023 साठी उशीराने दाखल होणार आहेत.

द. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३७० धावांचा डोंगर नेदरलँड्ससमोर उभा केला आहे. त्यात मार्करामने १२६ चेंडूंत १७५ धावा केल्या. यापैकी ११० धावा या १७ चौकार व ७ षटकारांतून कुटल्या आहेत. डेव्हिड मिलरनेही ६१ चेंडूंत ९१ धावांची खेळी केली.

एडन मार्करामने मागील काही महिन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. त्याने द. आफ्रिकेच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व केले. ट्वेंटी-२०त पहिले शतक झळकावले. दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये हैदराबादच्या फ्रँचायझीला जेतेपद मिळवून दिले. कसोटी संघात पुनरागमन करताना शतकी खेळी केली आणि आज वन डेतील पहिले शतक झळकावले.