Ind Vs Ban : “वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर..,” टीम इंडियाच्या पराभवावर माजी क्रिकेटपटूचा संताप

India Vs Bangladesh: भारताची बांगलादेश दौऱ्याची सुरूवात अतिशय निराशाजनक झाली आहे.

बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पोहोचलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. ढाका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात यजमानांनी दडपणाखाली शानदार खेळ केला आणि रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला.

या पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा आणि भारतीय संघाच्या कामगिरीवर टीका केली.

सामन्यानंतर सोनी स्पोर्ट्सवर बोलताना कैफने संघ व्यवस्थापनाला काही कठीण प्रश्न विचारले आणि बांगलादेशविरुद्ध भारताच्या पराभवामागील काही प्रमुख कारणेही सांगितली. कैफ म्हणाला की 40 व्या षटकानंतर भारतीय संघ दबावाखाली कोसळला आणि गोलंदाज चांगला खेळही करू शकले नाहीत.

या सामन्याबाबत बोलताना मोहम्मद कैफनेही भारतीय क्षेत्ररक्षणाबद्दलही आपले मत मांडले. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाने अतिशय खराब क्षेत्ररक्षण केले होते. महत्त्वाच्या प्रसंगी खेळाडूंनी चुका केल्या, जे पराभवाचे मुख्य कारण ठरल्याचे तो म्हणाला.

“भारताने हा सामना जिंकायला हवा होता, फलंदाजीतील खराब कामगिरीनंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि आपल्याला 40 षटकांपर्यंत खेळात ठेवले. यानंतर, दबावाच्या स्थितीत त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. आमचा डेथ ओव्हर्समधला बॉलर कोण आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दीपक चहर आणि कुलदीप सेन हे सध्या करू शकत नसल्याचं मत कैफनं मांडलं.

आम्ही झेल सोडले, केएल राहुल एक उत्तम फिल्डर आहे. परंतु त्यानं निराश केलं. एका ठिकाणी सुंदर कडूनही चूक झाली आणि तो झेल घेण्यासाठी गेला नाही. दबावाच्या स्थितीत चांगला खेळ दाखवायलाच हवा. विश्वचषकासारखी स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्याला भरपूर काम करण्याची गरज आहे असंही तो म्हणाला.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशनं पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पुढील सामना बुधवार, 7 डिसेंबर रोजी ढाका येथील शेर-ए बांगला स्टेडियमवर होणार आहे. मालिकेत पुनरागमन करण्यासाठी टीम इंडियाला सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे.