Join us  

'बिना पैशांचं कोण क्रिकेट खेळेल? पैसे नसते, तर मी पेट्रोल पंपावर काम करत असतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 1:13 PM

Open in App
1 / 9

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने गेल्या काही वर्षांत यशाची एक नवी उंची गाठली आहे. याचे मोठे श्रेय आयपीएलला जाते. कारण हा झटपट क्रिकेटचा प्रकार नसता, तर हार्दिकची प्रतिभा कुठेतरी पडद्यामागेच राहिली असती अथवा त्याला ही उंची गाठण्यासाठी थोडा अथिक वेळ लागला असता. (Hardik Pandya talks about money)

2 / 9

ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलताना हार्दिक पंड्याने आयुष्यात काम करण्याबरोबरच पैशाचे महत्वही सांगितले. एवढेच नाही, तर यावेळी त्याने पैसे कमवणे आणि चांगले पैसे कमवणे किती आवश्यक आहे, हेही सांगितले. याच बरोबर, अधिक पैसा असेल, तर खेळाडू खरोखरच विचलित होतात का? यावरही त्याने भाष्य केले.

3 / 9

पंड्याला यापूर्वी मुंबईने आयपीएलमध्ये 10 लाख रुपयांत खरेदी केले होते. पण 2018 मध्ये मुंबईने हार्दिकला 11 कोटी आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्याला 9 कोटींमध्ये कायम ठेवले.

4 / 9

यासंदर्भात बोलताना पांड्या म्हणाला, इतके पैसे मिळाल्यानंतरही तो खूप शांत आणि समाधानी होता. एकाच वेळी एवढे पैसे मिळाल्यामुळे तो अती उत्साही झाला नव्हता. तो म्हणाला, की आपण पूर्वीसारखेच आहोत, पण पैसे आल्याने जीवनात स्थिरता येते.

5 / 9

या मुलाखतीदरम्यान पंड्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यातील एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता आणि तो म्हणजे, खेळाडूंना आयपीएलमध्ये मिळणाऱ्या पैशांमुळे त्यांचे लक्ष विचलित होते? याशिवाय, आपल्याला लिलावात आता एवढे पैसेच मिळायला हवेत, असा विचार खेळाडू करतात? यावर उत्तर देताना पांड्या म्हणाला, जीवनात कधीही पैसा आला, तर आपण जमिनीवरच रहायला हवे.

6 / 9

पांड्या म्हणाला, 'पैसे असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे जीवनात बदल होतो. मी याचे मोठे उदाहरण आहे. अन्यथा आता मी पेट्रोल पंपावर काम करत असतो. मी विनोद करत नाही. माझ्यासाठी माझे कुटुंब माझी प्राथमिकता आहे आणि माझ्या कुटुंबाला चांगले आयुष्य मिळायला हवे. मी 2019 मध्ये, कुणाकडून तरी ऐकले होते, की 'पैसा सर्व तरुणांसाठी नसावा', याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे.'

7 / 9

पांड्या म्हणाला, 'जेव्हा गावाकडील अथवा एखाद्या छोट्या शहरातील मुलाला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळतो, तेव्हा तो, स्वतःचा नाही, तर आपल्या आई-वडिलांचा विचार करतो. तो आपल्या नातलगांकडे बघतो. पैशांमुळे बदल होतो आणि त्यापासून प्रेरणाही मिळते.

8 / 9

पैशांसंदर्भात बोलू नये, ही एक चुकीची धारणा आहे. यावर माझा विश्वास नाही. कारण जेव्हा तुम्ही स्वत:ला एखाद्या खेळासाठी झोकून देता, तेव्हा पैसेही महत्त्वाचे असायलाच हवेत. पैसे नसतील तर किती लोक क्रिकेट खेळतील मला माहीत नाही, असेही पांड्या म्हणाला.

9 / 9

हार्दिक पंड्या आणि पत्नी नताशा स्टॅन्कोविक.

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघपैसा
Open in App