स्मिथ, वॉर्नर, कमिन्स, स्टार्क, हेझलवूड... यांनी रचला असा विक्रम जो जगात कोणालाच नाही जमला

ऑस्ट्रेलियाचे आयसीसी स्पर्धांमध्ये वर्चस्व राहिले आहे. पुरूषांच्या संघाने ५ वन डे वर्ल्ड कप, १ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप,२ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची ढाल जिंकली आहे

ऑस्ट्रेलियाचे आयसीसी स्पर्धांमध्ये वर्चस्व राहिले आहे. पुरूषांच्या संघाने ५ वन डे वर्ल्ड कप, १ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप,२ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची ढाल जिंकली आहे, तर महिलांनी ६ वन डे वर्ल्ड कप आणि ६ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकले आहेत. अशा एकूण २१ ICC जेतेपदं ऑस्ट्रेलियन संघाच्या नावावर आहेत.

रविवारी ऑस्ट्रेलियाने उत्तम सांघिक कामगिरी करताना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकली. भारतीय संघावर त्यांनी २०९ धावांनी दणदणीत विजय मिळवला अन् इतिहास घडविला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभा केला अन् भारताचा पहिला डाव २९६ धावांवर गडगडला.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचीही सुरुवात काही खास झाली नाही, परंतु त्यांनी ८ बाद २७० धावांवर डाव घोषित करून भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि अजिंक्य यांनी ८६ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु ऑस्ट्रेलिया वरचढ ठरले. भारताचा दुसरा डाव २३४ धावांवर त्यांनी गुंडाळला.

आयसीसीच्या सर्व सहा स्पर्धा जिंकणारा तो पहिला संघ ठरला. शिवाय आयसीसीच्या सर्व सिनियर स्थराच्या स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश आहे. पण, याच संघातील पाच खेळाडूंनीही मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड हे आयसीसीच्या वन डे, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी जिंकणारे खेळाडू ठरले आहेत.

स्मिथ, वॉर्नर, कमिन्स, स्टार्क व हेझलवूड हे २०१५च्या वन डे वर्ल्ड कप, २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०२३ च्या WTC Final विजेत्या संघातील सदस्य आहेत. ICCच्या तीन प्रमुख ट्रॉफी उंचावणारे हे पाच खेळाडू आहेत. यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूंना हा पराक्रम जमलेला नाही.