Sunil Gavaskar Virat Kohli, IND vs NZ: धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराट कोहलीवर सुनील गावसकर अचानक संतापले; म्हणाले...

विराटने पहिल्या वन डे सामन्यात केली एक मोठी चूक

Sunil Gavaskar angry on Virat Kohli: भारतीय संघाने न्यूझीलंडच्या संघावर पहिल्या वन डे सामन्यात निसटता विजय मिळवला. शुबमन गिलच्या तुफानी द्विशतकाच्या (२०८) जोरावर भारताने ३४९ धावांपर्यंत मजल मारली होती. पण मायकल ब्रेसवेलच्या शतकाने (१४०) भारताला विजयासाठी झुंजवले. अखेर भारताने शेवटच्या षटकात सामना जिंकला.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डेमध्ये टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीने फलंदाजी दरम्यान एवढी मोठी चूक केली, ज्यामुळे सुनील गावस्कर त्याच्यावर चांगलेच संतापले. विराट कोहलीबद्दल सुनील गावस्कर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली. सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीबद्दल अचानक का व्यक्त केला संताप, त्यामागचे कारण, जाणून घेऊया

टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहली हा गेल्या काही सामन्यात धावांचा पाऊस पाडताना दिसत आहे. मात्र त्याची न्यूझीलंडविरूद्धची चूक भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी रूचली नाही. म्हणून त्यांनी त्याच्यावर टीका केली.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या डावाच्या १५व्या षटकात किवी फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने विराट कोहलीसारख्या फॉर्मात असलेल्या फलंदाजाला बाद केले. गोलंदाजाची फिरकी न समजू शकलेला विराट क्लीन बोल्ड झाला नि स्वस्तात तंबूत परतला.

किवी फिरकीपटू मिचेल सँटनरने 15व्या षटकातील दुसरा चेंडू विराट कोहलीला मिडल स्टंपच्या लाईनला टाकला होता. चेंडूत कोहलीपासून थोडा लांब होता, त्यामुळे विराट कोहलीने पुढचा चेंडू पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान तो चुकला आणि क्लीन बोल्ड झाला. त्यामुळेच विराट कोहली अवघ्या ८ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

त्यावर गावसकर संतापले. "तो काय शॉर्ट बॉल होता का? फॉर्ममध्ये असलेला विराटसारखा फलंदाज असा चेंडू मागे जाऊन कसा काय खेळला? विराटने मागे जाण्याऐवजी पुढे जायला हवे होते. त्या चेंडूला बाहेर जाण्यासाठी आणखी थोडे टर्न हवा होता. कोहलीने नेमकं गोलंदाजांला तेच करून दिलं. चेंडू पुढे खेळायला हवा असताना तो मागे गेला आणि चेंडू आत येण्याऐवजी बाहेर गेला नि विराट बोल्ड झाला."