सचिन तेंडुलकरनंतर आता 'या' खेळाडूला टीम इंडियात खेळताना बघायचंय- सुनील गावसकर

सुनील गावसकर आपल्या सडेतोड मतप्रदर्शनासाठी कायमच चर्चेत असतात

Sunil Gavaskar Sachin Tendulkar IND vs SA T20: भारतीय संघाला दक्षिण आफ्रिके विरूद्ध टी२० मालिकेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारताने दुसरी टी२० देखील गमावली.

भारताचे बडे फलंदाज २० षटकात केवळ १४८ धावांपर्यंतच मजल मारू शकले. आफ्रिकेने मात्र नव्याने संधी मिळालेल्या एनरीक क्लासें च्या दमदार खेळीच्या जोरावर सामना जिंकला.

भारतीय क्रिकेट संघातील लिटल मास्टर आणि माजी कर्णधार सुनील गावसकर हे आपली मतं रोखठोक मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी भारताच्या दुसऱ्या पराभवानंतर एक मोठं विधान केलं.

भारतीय संघाने दुसरी टी२० गोलंदाजीतील बोथटपणामुळे गमावली. आफ्रिकेचे पहिले ३ गडी झटपट बाद होऊनही भारताला सामना जिंकता आला नाही. त्यामुळे गावसकर काहीसे नाराज झाले.

भारतीय संघात धारदार गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवलं. मुख्य बाब म्हणजे, 'सचिन तेंडुलकरच्या नंतर एखाद्या भारतीय खेळाडूला खेळताना बघण्यासाठी जर मी उत्सुक असेन तर तो हाच गोलंदाज आहे', असेही विधान त्यांनी केले.

"क्रिकेटच्या खेळात सचिन तेंडुलकरचा टीम इंडियातील पदार्पणाचा सामना पाहण्यासाठी मी प्रचंड उत्सुक होतो. त्याच्यानंतर थेट उमरान मलिकचा टीम इंडियातील डेब्यू सामना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे", असे गावसकर म्हणाले.