भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. स्टीव्ह स्मिथ (७३) आणि अलेक्स कॅरी (६१) यांच्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २६४ धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या (८४) झुंजार खेळीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. श्रेयस अय्यर (४५) आणि केएल राहुल (४२) या दोघांनीही दमदार खेळी केली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात केली होती, पण २८ धावा काढून तो माघारी परतला. सामना संपल्यानंतर गावसकरांनी रोहितवर नाराजी व्यक्त केली.
सुनील गावसकर म्हणाले, 'गेल्या दोन वर्षांपासून रोहित शर्मा आक्रमक सलामी देताना दिसतोय. भारतात वर्ल्डकप सुरू झाला तेव्हापासून तो असाच खेळतोय आणि तो आजही त्याच पद्धतीने खेळतोय. सुरुवातीला त्याला खूप यश मिळाले पण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही.'
'रोहित शर्मा हा अतिशय प्रतिभावान फलंदाज आहे. त्याच्या भात्यात अनेक चांगले फटके आहेत पण तो ज्याप्रकारे खेळतोय, ते पाहता त्याला आपला खेळ दाखवण्याची संधी मिळत नाही. चाहत्यांना खेळ पाहताना मजा यावी म्हणून त्याने अशा प्रकारे खेळायला सुरुवात केली होती. मीदेखील त्याबद्दलच सांगतोय.'
'चाहत्यांना मजा यावी म्हणून रोहितने बिनधास्त फटकेबाजी करावी पण त्यात थोडं तारतम्य हवं. जर तो २५ षटके खेळला तर भारताचा स्कोर १८०-२०० पर्यंत पोहोचेल आणि ५० षटकांत सहज ३५० धावांचा टप्पा गाठता येईल. त्यामुळे मला वाटतं की रोहितने पुन्हा एकदा विचार करावा.'
'केवळ मैदानात जाऊन आक्रमक फलंदाजी करणे इतकंच डोक्यात असल्याने रोहित हल्ली फारसा प्रभावी ठरताना दिसत नाही. त्याऐवजी फटकेबाजीला संयमाची जोड मिळाली आणि तो २५ ते ३० ओवरपर्यंत तो टिकला, तर ते भारताच्या फायद्याचे आहे.'
'सध्या रोहित जसा खेळतोय त्यात तो केवळ २५ ते ३० धावाच बनवतोय. ही गोष्ट किती जणांना आवडत असेल? माझं असं मत आहे की तो जर २५ षटकांपर्यंत खेळला तर भारताला त्याच्या खेळीचा जास्त उपयोग होईल,' असे प्रामाणिक मत गावसकरांनी व्यक्त केले.