जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग (IPL) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलविषयी बरेच माजी क्रिकेटपटू स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि क्षण याविषयी भाष्य करत आहेत.
अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. अलीकडेच गंभीरने एबी डिव्हिलियर्स आणि सुरेश रैनाची तुलना केली, ज्यावरून गंभीरला ट्रोल केले जात आहे.
खरं तर गौतम गंभीरने म्हटले की, आयपीएलमध्ये सुरेश रैनाने एबी डिव्हिलियर्सपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. रैनाने 4 आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, तर डिव्हिलियर्सने केवळ वैयक्तिक रेकॉर्ड केले आहेत.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना विविध मुद्द्यावर भाष्य केले. एकूणच डिव्हिलियर्सने वैयक्तिक विक्रम देण्यावर भर दिला असल्याचे गंभीरने सांगितले.
दरम्यान, गौतम गंभीर त्याच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. आता त्याने रैनाची तुलना डिव्हिलियर्सशी केल्याने नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.
'डिव्हिलियर्स चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळायचा. ते एक लहान मैदान आहे, जिथे सीमारेषा देखील लहान आहे. त्यामुळे कोणीही तिथे खेळत असेल तर तो धावा नक्कीच करेल. सुरेश रैनाने 4वेळा ट्रॉफी जिंकली आहेत. डिव्हिलियर्सकडे फक्त वैयक्तिक विक्रम आहेत', असे गंभीरने म्हटले.
गंभीरच्या या विधानावरून त्याला आता सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. मात्र, काही चाहत्यांनी गंभीरचे विधान बरोबर असल्याचे म्हटले आहे.
एबी डिव्हिलियर्सच्या आयपीएल रेकॉर्डबद्दल भाष्य करायचे झाले तर, दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूने आयपीएलमध्ये 184 सामन्यांमध्ये 39.71 च्या सरासरीने 5162 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतके आणि 40 अर्धशतके झळकावली आहेत. मात्र, त्याच्या आरसीबीच्या संघाला एकदाही जेतेपद जिंकता आले नाही.
भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा हिस्सा होता. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेच्या संघाने 4वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे.
रैनाला मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखले जाते. त्याने 205 आयपीएल सामन्यांमध्ये 32.52 च्या सरासरीने आणि 136.76 च्या स्ट्राईक रेटने एकूण 5528 धावा केल्या आहेत. रैनाने जगातील सर्वात लोकप्रिय लीगमध्ये 1 शतक आणि एकूण 39 अर्धशतके झळकावली आहेत.