'सूर्या'च्या यादीत सचिनचाही समावेश; 'हॅटट्रिक डक'मुळे नोंदवला लाजिरवाणा विक्रम!

suryakumar yadav sachin tendulkar : भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत खातेही उघडता आले नाही.

भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत खातेही उघडता आले नाही. तीन सामन्यांच्या मालिकेतील सर्व डावात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात सूर्याला स्टार्कने एलबीडब्ल्यू करून बाहेरचा रस्ता दाखवला होता. यानंतर चेन्नईतील सामन्यात तो ॲश्टर अगरचा शिकार झाला. तीन सामन्यांत सूर्यकुमार यादवच्या बॅटला एकही चेंडू न लागल्याने त्याच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.

सलग तीन डावात खाते न उघडता बाद झाल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. पण सलग तीन वन डे डावात खाते न उघडणारा सूर्यकुमार यादव हा पहिला भारतीय फलंदाज नाही. त्याच्या आधी पाच खेळाडूंना याचा सामना करावा लागला आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील सलग तीन वन डे डावात खाते न उघडता बाद झाला आहे. 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध, 2018 मध्ये वेस्ट इंडिज आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नव्हते. 10 किंवा 11व्या क्रमांकावर खेळल्यामुळे त्याची फलंदाजी बऱ्याच काळानंतर येते.

इशांत शर्माचा देखील या यादीत समावेश आहे. 2010 मध्ये श्रीलंकेविरूद्ध खाते न उघडता बाद झाल्यानंतर त्याला 2011 मध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली. तेव्हा वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना तो सलग दोनवेळा डक बाद झाला.

भारताचा माजी गोलंदाज झहीर खानच्या नावावर देखील या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद आहे. 2003 आणि 2004 मध्ये सलग तीन डावात तो शून्यावर बाद झाला होता.

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज अनिल कुंबळे याच्या नावावर कसोटीत शतक आहे. पण 1996 मध्ये त्याला सलग 3 वन डे डावात खाते उघडता आले नव्हते. यामधील दोन वन डे सामने इंग्लंडविरुद्ध आणि एक ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरचा देखील या यादीत समावेश आहे. 1994 मध्ये सचिन श्रीलंकेविरूद्ध शून्यावर बाद झाला होता.

त्याच्या पुढच्या डावात तो वेस्ट इंडिजविरूद्ध 2 डावात शून्यावर बाद झाला होता. पण तिसऱ्या डक नंतर त्याने शतक ठोकून शानदार पुनरागमन केले होते.

सलग तीन वन डे डावात जगातील नामांकित फलंदाजांना देखील खाते उघडता आलेले नाही. शेन वॉटसन, अँड्र्यू सायमंड्स, शोएब मलिक, तातेंडा तैबू, लान्स क्लुसनर, रिकी पाँटिंग, टॉम मूडी आणि ॲलेक स्टीवर्ट या मोठ्या नावांचा या यादीत समावेश आहे.