सूर्यकुमार यादव मजबूत पैसा छापणार! घराबाहेर लागलीय रांग, ब्रँड व्हॅल्यूमध्ये २०० टक्क्यांनी वाढ!

भारतीय संघ यंदाचा ट्वेन्टी-२० वर्ल्डकप जिंकू शकली नसली तरी संघातील काही खेळाडूंची 'दिवाळी' होणार आहे. संपूर्ण स्पर्धेत संघातील काही खेळाडूंनी नक्कीच लक्ष वेधून घेतलं आहे. यातील एक नाव म्हणजे सूर्यकुमार यादव. ज्यानं आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं भारतीयांचं मन जिंकलं आहे. तर आयसीसीच्या ट्वेन्टी-२० फलंदाजांच्या यादीत त्यानं अव्वल स्थान देखील गाठलं आहे.

सूर्यकुमार यादव मैदानाबाहेरही सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. कारण सूर्यकुमारच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये आता २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट विश्वात दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारला आपल्या प्रोडक्टच्या जाहिरातीत घेण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत. यात परदेशी कंपन्यांचाही समावेश आहे.

टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या वृत्तानुसार सूर्यकुमारच्या मागणीमध्ये इतकी वाढ झाली आहे की त्यांना दिवसागणिक मिळणाऱ्या जाहिरात फीमध्ये २०० टक्क्यांची वाढ झाली आहे. एंडोर्समेंटमधून दर दिवसाला सूर्यकुमारला मोठी कमाई मिळत आहे.

जवळपास ६ ते ७ मोठे ब्रँड सूर्यकुमार यादवला आपल्या कंपनीचा ब्रँड अम्बेसिडर घोषीत करण्याच्या शर्यतीत आहेत. यात बेवरेज, मोबाइल अॅक्सेसरिज, मीडिया आणि स्पोर्ट्स विभागांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादव आयपीएल आधी दरदिवसासाठी २० लाख रुपये फी आकारत होता. मीडिया रिपोर्टनुसार त्यानं आता एका दिवसाच्या फीमध्ये वाढ करुन ती ६५ ते ७० लाख रुपये इतकी केली आहे.

सूर्यकुमार यादव याआधी चार ब्रँडसोबत जोडला गेलेला आहे. पण आता त्यात वाढ होऊन ही संख्या २० पर्यंत पोहोचू शकते. इंडस्ट्री तज्ज्ञांच्या माहितीनुसार नवे खेळाडू दर दिवसामागे २५ ते ५० लाख रुपये आकारतात. तर यशस्वी खेळाडू एका दिवसाचे ५० ते १ कोटी रुपये ब्रँड एंडोर्समेंटमधून कमावतात.

सूर्यकुमार यादवनं आयपीएलमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तेव्हा त्याला फक्त १० लाख रुपये मिळाले होते. ज्यात वाढ होऊन २०२२ साली ८ कोटी रुपये इतके जाले. सध्या तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. २०१३ सालापर्यंत आयपीएलमधून सूर्यकुमार यादवची कमाई केवळ १० लाख रुपये इतकी होती. महिन्याचा हिशोब पकडला तर जवळपास ८० लाख रुपये इतकी होती. सध्याच्या कमाईची आकडेवारी पाहिली तर सूर्यकुमार यादवची एकूण संपत्ती ४ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ३२ कोटी रुपये इतकी आहे.

सूर्यकुमार फ्री हिट आणि ड्रीम-११ कंपनीसोबत करारबद्ध आहे. दोन्ही देशातील लोकप्रिय फॅन्टसी स्पोर्ट्स अॅप आहेत. तसंच मॅक्सिमा वॉच, सरीन स्पोर्ट्स, नीमन शूज यांसारख्या ब्रँडचं प्रमोशन देखील सूर्यकुमार करतो. यातूनही बक्कळ पैसा सूर्यकुमार कमावत आहे. सूर्यकुमारकडे हायस्पीड कारचं कलेक्शन देखील आहे.

सूर्यकुमारनं नुकतंच त्याच्या ताफ्यात Mercedes-Benz GLE Coupe ही आलिशान कार दाखल केली. या कारची किंमत जवळपास २.१५ कोटी रुपये इतकी आहे. सूर्यकुमारचं कार कलेक्शन पाहायचं झालं तर यात १५ लाख किमतीची निसान जोंगा, ९० लाख रुपये किमतीची रेंज रोवर वेलार, मिनी कूपर एस आणि ६० लाख रुपये किमतीची ऑडी ए-६ यासारख्या महागड्या कारचा समावेश आहे.

सूर्यकुमार यादव सध्या आयसीसी ट्वेन्टी-२० सर्वोत्कृष्ट फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध पराभव झाला. पण संपूर्ण स्पर्धेत सूर्यकुमारची फलंदाजी लक्षवेधी ठरली. या वर्ल्डकपमध्ये त्यानं तीन अर्धशतकं झळकावली. नेदरलँड्स, द.आफ्रिका आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात त्यांन अर्धशतकी कामगिरी केली आहे. तसंच २०२२ या वर्षात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १,०२६ धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.