विंडीजचा आणखी एक सामना शिल्लक आहे आणि त्यात ऑस्ट्रेलियावर मात करून ते ग्रुप १मधील उपांत्य फेरीचं समीकरण बिघडवू शकतील. त्यामुळेच ८ गुण मिळवूनही इंग्लंडचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के होत नाही. जाणून घेऊयात कशी आहे ग्रुप १ मधील अंतिम टप्प्याची लढाई...
श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १८९ धावा चोपल्या. पथूम निसंका आणि कुसल परेरा यांनी ४२ धावांची भागीदारी केली. परेरा २१ चेंडूंत २९ धावांवर माघारी परतला. निसंका व चरिथ असलंका यांनी दुसऱ्या विकेटसाठी वेस्ट इंडिजला रडवलं. निसंका ४१ चेंडूंत ५ चौकारांसह ५१ धावांवर माघारी परतला. असलंकानं ४१ चेंडूंत ८ चौकार १ षटकारासह ६८ धावा केल्या. कर्णधार दासून शनाकानं १४ चेंडूंत नाबाद २५ धावा चोपल्या.
प्रत्युत्तरात ख्रिस गेल ( १) व एव्हिन लुईस ( ८) ही जोडी पुन्हा अपयशी ठरली. रोस्टन चेसही ९ धावांवर माघारी परतला. निकोलस पूरन व शिमरोन हेटमायर यांनी कडवा संघर्ष केला, परंतु त्यांना विजय साकारता आला नाही. पूरन ३४ चेंडूंत ६ चौकार १ षटकारासह ४६ धावांवर माघारी परतला.
हेटमारयला अन्य फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. आंद्रे रसेल( २), किरॉन पोलार्ड ( ०) , जेसन होल्डर ( ८) व ड्वेन ब्राव्हो ( २) यांनी मोक्याच्या क्षणी कच खाल्ली. हेटमायर ५४ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ८१ धावांवर नाबाद राहिला. पण, त्याला विंडीजला ८ बाद १६९ धावांपर्यंतच नेता आले. श्रीलंकेनं हा सामना २० धावांनी जिंकला.
इंग्लंडचा संघ सलग चार विजय मिळवून ८ गुण व ३.१८३ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियानं आज बांगलादेशवर ६.२ षटकांत विजय मिळवून नेट रन रेट बराच सुधारला. ते ६ गुण व १.०३१ नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर सरकले आहेत. दक्षिण आफ्रिका ६ गुण व ०.७४२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
या गटातील अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंड-दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज यांच्यात ६ नोव्हेंबरला लढत होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा सामना दुपारी आहे आणि त्यामुळे सायंकाळच्या सामन्यानंतर उपांत्य फेरीतील दुसरा संघ निश्चित होईल.
ऑस्ट्रेलियाला जर विंडीजकडून पराभव पत्करावा लागला, तर दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडवर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करता येईल. पण, ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला, तर आफ्रिकेला नेमक्या किती धावांच्या किंवा षटकांच्या फरकानं जिंकायचंय हे दुपारच्या लढतीनंतर स्पष्ट होईल.
ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांनी चमत्कारिक खेळ करून आपापल्या सामन्यात मोठ्या फरकानं विजय मिळवल्यास इंग्लंडही बाहेर फेकला जाऊ शकतो.