T20 World Cup 2022: भारताच्या आगामी सामन्यावर पावसाचं सावट, बिघडू शकतं सेमीफायनलचं समीकरण

T20 World Cup 2022: भारतीय क्रिकेट संघाचा पुढील सामना ॲडलेडमध्ये बांगलादेशसोबत होणार आहे.

भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील रविवारच्या सामन्यात निराश केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून हॅटट्रिक साजरी करण्याची संधी रोहित आणि टीमला होती. पण, फलंदाजांनी निराश केल्यानंतर गोलंदाजांना फार काही करण्यासाठी उरलेच नाही.

सूर्यकुमार यादवच्या ६८ धावांच्या जोरावर भारतानं कशातरी १३३ धावांपर्यंत मजल मारली. पण, विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांनी घात केला आणि भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पहिला पराभव ठरला.

या पराभवानंतर आपल्या ग्रुपमधील पहिलं स्थान भारतीय संघाला गमवावं लागलं आहे. आता ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघाचे दोन सामने शिल्लक आहेत आणि सहजरित्या सेमीफायनलचं तिकिट मिळवण्यासाठी दोन्ही सामने जिंकणंही आवश्यक आहे.

परंतु ऑस्ट्रेलियातील ज्या ठिकाणी हा सामना होणार आहे, तेथील हवामान भारताच्या सेमीफायनलच्या मर्गातील अडथळा ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टीम इंडिया आपला पुढील सामना बांगलादेशविरोधात ॲडलेड येथे खेळणार असून त्या ठिकाणी पावसाचे सावट आहे.

बुधवारी २ नोव्हेंबर रोजी भारतीय संघ शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या संघाशी भिडणार आहे. Accuweather च्या रिपोर्टनुसार या मॅचच्या दिवशई ॲडलेड येथे ६० चक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर संपूर्ण दिवस काळ्या ढग असतील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

तर दुसरीकडे Worldweatheronline च्या रिपोर्टनुसार संध्याकाळच्या सुमारास हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो, परंतु रात्री मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार भारताचा हा सामना संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे.

जर सामन्यादरम्यान पाऊस झाला आणि सामना खेळवता आला नाही, तर दोन्ही संघांना एक-एक गुण मिळेल. दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. जर भारताला १ अंक मिळाला तर भारताचे एकूण अंक ५ होती आणि सेमीफायनलला पोहोचण्यासाठी ते पुरेसे नाहीत. असं झाल्यास भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत झिम्बाव्बेविरोधात विजय मिळवावाच लागेल. भारताचा पुढील सामना २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरोधात आणि नंतर ६ नोव्हेंबर रोजी झिम्बाव्बे विरोधात होणार आहे.