Join us  

Super 12s qualification scenario: श्रीलंका पास, ७ संघ ३ जागांच्या जवळपास! सुपर १२चं मजेशीर गणित अन् भारताचं वाढणार टेंशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 1:48 PM

Open in App
1 / 7

T20 World Cup 2022 Super 12s qualification scenario: पहिल्याच सामन्यात लिंबू टिंबू नामिबियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेने जबरदस्त पुनरागमन केले. यूएईनंतर अ गटातील आजच्या सामन्यात नेदरलँड्सवर थरारक विजय मिळवून त्यांनी सुपर १२ मध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या संघाचा मान पटकावला. आता उर्वरित ३ जागांसाठी ७ संघांमध्ये चढाओढ रंगणार आहे.

2 / 7

कुसल मेंडिस ( ७९) व चरिथ असलंका ( ३१) यांनी दमदार खेळ करताना संघाला ६ बाद १६२ धावांचा सन्मानजनक पल्ला उभारून दिला. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी त्यांच्यावरील जबाबदारी चोख पार पाडली. नेदरलँड्सच्या मॅक्स ओ'डाऊडने ( Max O'Dowd) अखेरपर्यंत संघर्ष केला. त्याने ५३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार मारून नाबाद ७१ धावा केल्या. श्रीलंकेने हा विजय मिळवून सुपर १२ मध्ये प्रवेश पक्का केला. १६ धावांनी श्रीलंकेनं अ गटातून सुपर १२मध्ये आपले स्थान पक्के केले.

3 / 7

मेंडिस व असलंका यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. असलंका ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर मेंडिसने खिंड लढवली. त्याने ४४ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ७९ धावा केल्या. २०व्या षटकात तो बाद झाला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या यष्टिरक्षकाने केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी कुमार संगकाराने २००९मध्ये भारताविरुद्ध ७८ धावा केल्या होत्या.

4 / 7

नेदरलँड्सकडून मॅक्स ओ'डाऊडने दमदार खेळ केला. त्याने संघाला ९ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारून देताना नाबाद ७१ धावा केल्या. वनिंदू हसरंगाने ३, महिषा थिक्सानाने दोन विकेट्स घेतल्या. लहिरु कुमारा व बिनुरा फर्नांडो यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली आणि संघाचा विजय पक्का केला. श्रीलंकने ३ सामन्यांत २ विजय मिळवताना ४ गुण व +०.६६७ नेट रन रेटसह सुपर १२मधील प्रवेश पक्का केला.

5 / 7

अ गटात नेदरलँड्सच्या खात्यातही ४ गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट -०.१६२ असा आहे. नामिबिया व यूएई यांचे प्रत्येकी दोन सामने झाले आहेत. नामिबियाने पहिला सामना जिंकून २ गुण कमावले आहेत, परंतु यूएईची पाटी कोरीच आहे. त्यामुळे हा सामना अ गटातून दुसऱ्या क्रमांकासाठी कोण सुपर १२मध्ये जाईल यासाठी महत्त्वाचा आहे.

6 / 7

नामिबियाने आज सामना जिंकल्यास श्रीलंका ग्रुप २ मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याशी भिडेल. विजयासोबतच नामबिया सुपर १२मध्ये प्रवेश करेल. पण, यूएईने विजय मिळवल्यास नेदरलँड्सचा पुढचा मार्ग सुकर होईल.

7 / 7

ब गटात स्कॉटलंड, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज व आयर्लंड यांच्या खात्यात प्रत्येकी २ गुण आहेत. स्कॉटलंड +०.७५९ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे, तर आयर्लंड - ०.४६८ नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर आहे. उद्या आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात सामना होणार. या दोन्ही सामन्यांतील विजेता संघ सुपर १२मध्ये प्रवेश करतील. फक्त नेट रेटवर कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये जाईल हे ठरेल.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२श्रीलंकावेस्ट इंडिजआयर्लंड
Open in App