PHOTOS : कुठे हसू तर कुठे आनंदाश्रू! अफगाणिस्तानची सेमीफायनलमध्ये धडक; खेळाडू भावूक

AFG vs BAN Live Match updates : राशिद खानच्या नेतृत्वातील अफगाणिस्तानचा उपांत्य फेरीत प्रवेश.

ट्वेंटी-२० विश्वचषकात बांगलादेशचा पराभव करताच अफगाणिस्तानचे खेळाडू भावूक झाले. आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

बांगलादेशच्या पराभवासह बलाढ्य ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर झाला आहे. राशिद खानच्या नेतृत्वातील अफगाणिस्तानच्या संघाने मागील काही दिवसांपासून सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे.

दरम्यान, उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होईल, तर अफगाणिस्तान अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. अफगाणिस्तानच्या विजयानंतर राजधानी काबुल येथे चाहत्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली.

सामन्यानंतर बोलताना कर्णधार राशिद म्हणाला की, आम्ही आमच्या मायदेशात परतल्यावर जोरदार जल्लोष करू. आमच्या देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. मला याबद्दल बोलण्यासाठी शब्दही कमी पडत आहेत.

ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ मधील अखेरचा सामना नाना कारणांनी खास ठरला. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या या सामन्यावर ऑस्ट्रेलियन संघाचे भवितव्य अवलंबून होते. कारण दोन्हीही संघांसाठी उपांत्य फेरीत जाण्याची संधी होती.

याशिवाय अफगाणिस्तानच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा मार्ग मोकळा होणार होता. पण, पावसाची बॅटिंग अन् साऱ्यांचीच धाकधुक वाढली. अखेर अफगाणिस्तानने ८ धावांनी सामना जिंकून प्रथमच उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले.

अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकांत ५ बाद ११५ धावा करून बांगलादेशला विजयासाठी ११६ धावांचे लक्ष्य दिले होते. पण, पावसामुळे अनेकदा सामना थांबवावा लागला. मग एक षटक कमी करण्यात आले.

राशिद खानने सर्वाधिक चार बळी घेऊन बांगलादेशला १७.५ षटकांत १०५ धावांवर सर्वबाद केले आणि ८ धावांनी सामना जिंकला. या विजयासह अफगाणिस्तानने प्रथमच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला, तर ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले.

भारत आणि अफगाणिस्तान हे दोन आशियाई संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरले. अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पाऊस, राशिद खानचे वादळ आणि लिटन दासची संयमी खेळी... यामुळे हा सामना प्रेक्षणीय ठरला.