AFG vs NZ : अफगाणिस्ताननं इतिहास रचला! पहिल्यांदाच न्यूझीलंडला घाम फोडला, राशिदच्या संघानं गड जिंकला

AFG vs NZ Live Match Updates : अफगाणिस्तानने ट्वेंटी-२० विश्वचषकात प्रथमच न्यूझीलंडचा पराभव केला.

अफगाणिस्तानने क गटातील साखळी फेरीतील सामन्यात न्यूझीलंडचा दारूण पराभव केला. यासह त्यांनी या गटातील क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. कर्णधार राशिद खानने सर्वाधिक चार बळी घेत किवी संघाला पराभवाची धूळ चारली.

ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला. १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ७५ धावांत गारद झाला आणि अफगाणिस्तानने ८४ धावांनी सामना जिंकला.

अफगाणिस्तानचा कर्णधार मॅचविनर ठरला. त्याने केवळ १८ धावा देत ४ बळी घेतले. यामध्ये प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार केन विल्यमसनच्या बळीचाही समावेश होता.

ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सुरुवातीपासूनच मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला, तर कॅनडाने आयर्लंडला नमवून विश्वचषकात विजयाचे खाते उघडले.

अशातच शनिवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने बलाढ्य न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी कमाल करत किवी संघाच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले.

अफगाणिस्तानने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला घाम फुटला. राशिद खान, फजलहक फारुकी आणि मोहम्मद नबी यांनी फिरकीच्या जोरावर किवी संघाचा दारूण पराभव केला.

किवी संघाकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक १८ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खानने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर फजलहक फारुकी (३) आणि मोहम्मद नबीने (२) बळी घेतले.

अखेर किवी संघ १५.२ षटकांत सर्ववाद केवळ ७५ धावा करू शकला आणि ८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रहमानुल्लाह गुरबाजच्या (८०) स्फोटक खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने सन्मानजनक धावसंख्या उभारली.

ट्वेंटी-२० विश्वचषकातील अफगाणिस्तानचे मोठे विजय - १३० धावा विरूद्ध स्कॉटलंड (२०२१), १२५ धावा विरूद्ध युगांडा (२०२४), ८४ धावा विरूद्ध न्यूझीलंड (२०२४), ६२ धावा विरूद्ध नामिबिया (२०२१).