भारताचा रोमांचक विजय! सामन्यात झाले असे ५ रेकॉड्स, ज्यामुळे पाकिस्तानची झाली 'बोलती बंद'

T20 World Cup 2024, IND vs PAK: जसप्रीत बुमराहने १४ धावांत ३ बळी घेत सामना फिरवला अन् टीम इंडियाने अनेक विक्रम केले

मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने पाकिस्तानला १२० धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र बाबर आझमच्या संघाला २० षटकांत ७ बाद ११३ धावाच करता आल्या. या सामन्यात ५ असे विक्रम झाले, ते पाहून पाकिस्तानची मान शरमेने खाली जाईल.

झिम्बाब्वेच्या नावावर टी२० मध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वात लहान लक्ष्याचा बचाव करण्याचा विक्रम आहे. त्यांनी २०२१ मध्ये ११९ धावांचा बचाव केला होता. आता या यादीत भारताचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने १२० धावांचे लक्ष्य देऊन त्याचा यशस्वी बचाव केला.

T20 विश्वचषकात एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. या स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत ७ वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही संघाला इतर कोणत्याही संघाने एवढ्या वेळा पराभूत केलेले नाही.

T20 विश्वचषकात सर्वात लहान लक्ष्याचा बचाव करण्यात भारताने श्रीलंकेसोबत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध १२० धावांचा यशस्वी बचाव केला होता. आता या यादीत श्रीलंकेसह भारताचेही नाव जोडले गेले आहे. T20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताने यशस्वी बचावाच्या बाबतीत संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे.

भारताने टी२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरूद्ध सर्वात लहान लक्ष्याचा बचाव करण्याचा नवा विक्रम केला. याआधी भारताने २०१६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्ध टी२० मध्ये १३९ धावांचा यशस्वी बचाव केला होता. तो विक्रम भारताने पाक विरूद्ध मोडला.

न्यूयॉर्कच्या सामन्यात पाकिस्तानने टी२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला ऑलआउट केले. याआधी टी२० मध्ये पाकिस्तानने भारताला ऑल आउट केले नव्हते. या सामन्यात पाकिस्तानला ही किमया साधता आली तरीही त्यांना पराभवाचा स्वीकार करावा लागला.