T20 World Cup: हा खेळ आकड्यांचा! 'तो' दिवस टीम इंडियासाठी सतत पनवती ठरला; सामना असो वा नसो, धक्का बसला

T20 World Cup: टी-२० विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर; न्यूझीलंडच्या विजयानं टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात

टी-२० विश्वचषक स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आज भारतीय संघ नामिबियाचा सामना करेल. मात्र या सामन्याला काहीच अर्थ नाही. ब गटातून पाकिस्तान आणि न्यूझीलंडनं उपांत्य फेरी गाठल्यानं भारत वि. नामिबिया सामना आता केवळ औपचारिकता आहे.

ब गटात भारताला पहिल्या २ सामन्यांमध्ये मोठे पराभव पत्करावे लागले. पाकिस्तान आणि न्यूझीलंडनं मोठ्या फरकानं भारताला नमवलं. त्यामुळे भारतावर उपांत्य फेरीसाठी इतर सामन्यांच्या निकालांकडे पाहण्याची वेळ आली आहे.

अफगाणिस्ताननं काल न्यूझीलंडचा पराभव केला असता, तर भारताला उपांत्य फेरीची संधी मिळाली असती. मात्र किवींनी अफगाणिस्तानचा पराभूत करत भारताच्या आशा अपेक्षांना सुरुंग लावला. अफगाणिस्तानच्या पराभवासोबत भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं.

क्रिकेट म्हणजे आकड्यांचा खेळ. या आकड्यांच्या खेळामुळेच अ गटात दक्षिण आफ्रिकेला धक्का बसला. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी ८ गुण झाले. मात्र नेट रनरेटच्या जोरावर इंग्लंड, ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. दक्षिण आफ्रिकेला मात्र गाशा गुंडाळावा लागला.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला दर रविवारी जोरदार झटके बसले. भारतीय संघ खेळत असो वा नसो प्रत्येक रविवार भारताला धक्का देऊन गेला. पहिल्या रविवारी भारताला पाकिस्ताननं मोठ्या फरकानं नमवलं. विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला.

दुसऱ्या रविवारीदेखील भारताला धक्का बसला. त्यावेळी न्यूझीलंडनं भारताला पराभूत केलं. तिथूनच भारताच्या आशा संपुष्टात येऊ लागल्या. दोन मोठ्या पराभवांमुळे भारताचा नेट रनरेट खराब होता.

कालदेखील रविवार होता. काल तर भारताचा सामनाही नव्हता. मात्र तरीही कालचा दिवस भारताला धक्का देऊन गेला. भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहण्यासाठी काल अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव करणं गरजेचं होतं. मात्र न्यूझीलंडनं अफगाणिस्तानला पाणी पाजत भारताचं आव्हानदेखील संपुष्टात आणलं.

गेले तीन रविवार भारतासाठी धक्कादायक ठरले. तीनही दिवशी भारताला हादरे बसले. आज भारताचा सामना नामिबियाशी होत आहे. मात्र उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्यानं नामिबिया विरुद्धचा सामना भारतासाठी केवळ औपचारिकता असेल.

भारतीय संघ फेव्हरिट म्हणून टी-२० विश्वचषक स्पर्धेला गेला होता. टी-२० संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही शेवटची स्पर्धा होती. प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचीही अखेरची स्पर्धा होती. मात्र याच स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीदेखील गाठता आली नाही.

Read in English