पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंडकडून भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागल्यानं टी-२० विश्वचषकात टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
भारताला सहज नमवत न्यूझीलंडनं आव्हान कायम राखलं आहे. न्यूझीलंडनं ८ गडी राखून भारतावर सफाईदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं ७ फलंदाजी गमावून अवघ्या ११० धावा केल्या. न्यूझीलंडनं हे आव्हान अगदी सहज पार केलं.
दोन मोठ्या पराभवांमुळे भारतीय संघ उपांत्य फेरी गाठेल ही आशा धूसर झाली आहे. टीम इंडिया दुसऱ्या गटात पाकिस्तान, अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि नामिबिया यांच्यानंतर पाचव्या स्थानी आहे.
दुसऱ्या गटात एकूण सहा संघ आहेत. पैकी दोन संघासोबत भारताचे सामने झाले आहेत. त्यात दारूण पराभव झाल्यानं आता या स्थितीतून भारत उपांत्य फेरी गाठू शकेल का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. आयसीसीनं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
भारतीय संघाला ३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानला, ५ नोव्हेंबरला स्कॉटलंडला आणि ८ नोव्हेंबरला नामिबियाला हरवावं लागेल. दोन मोठ्या पराभवांमुळे भारताचा नेट रन रेट अतिशय खराब आहे. तो सुधारण्यासाठी या तिन्ही सामन्यांत दणदणीत विजय गरजेचा आहे.
यासोबतच अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडमधील किमान एका संघानं तरी न्यूझीलंडला हरवावं, यासाठी टीम इंडियाला प्रार्थना करावी लागेल. त्यामुळे उपांत्य फेरीच्या आशा उंचावतील.
अफगाणिस्तान संघानं स्कॉटलंडचा मोठा पराभव करत नेट रनरेट +३.०९७ वर नेला आहे. हा नेट रननेट अतिशय उत्तम आहे. त्यामुळे भारतीय संघाला अफगाणिस्तानला मोठ्या अंतरानं पराभूत करावं लागेल. यासोबतच अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला कमी अंतरानं हरवावं, अशीही प्रार्थना करावी लागेल.
अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला हरवलं तर भारताच्या उपांत्य फेरीचा आशा उंचावतील. त्यासोबतच नामिबिया किंवा स्कॉटलंडनं न्यूझीलंडला पराभूत केल्यास भारताचा मार्ग सुकर होईल.