मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं स्कॉटलंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्यानंतर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी तुफान फटकेबाजी करताना भारताला दणदणीत विजय मिळवून दिला.
जसप्रीत बुमराहनं ३.४ षटकांत १० धावा देत २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा ( ३-१५) नं ट्वेंटी-२०तील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, तर मोहम्मद शमीनं ३ षटकांत १ निर्धाव षटक फेकताना १५ धावांत तीन विकेट्स घेतल्या. स्कॉटलंडकडून जॉर्ज मुन्सी ( २४), मिचेल लिस्क ( २१) हे चांगले खेळले. स्कॉटलंडचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत ८५ धावांवर माघारी परतला.
रोहित-राहुल जोडीनं चार षटकांत धावफलकावर अर्धशतकी धावा फडकवल्या. रोहित १६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३० धावांवर बाद झाला. राहुलनं १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. राहुलनं १९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ५० धावा केल्या. भारतानं हा सामना ८ विकेट्स व ८१ चेंडू राखून जिंकला. भारतानं ६.३ षटकांत २ बाद ८९ धावा केल्या.
या सामन्यानंतर स्कॉटलंडचा कर्णधार कायले कोएत्झर यानं विराट कोहलीला संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये येण्याची विनंती केली आणि विराटसह रोहित शर्मा, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आदी खेळाडू स्कॉटलंडच्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांच्या ड्रेसिंगरुममध्ये पोहोचले.