T20 World Cup, Babar Azam : विराट कोहलीसमोर ज्याला कच्चालिंबू समजलं, तोच बाबर आजम मोडतोय एकामागून एक विक्रम, त्यानं रोहित शर्मालाही नाही सोडलं!

T20 World Cup, PAKISTAN V NAMIBIA : पाकिस्तान संघाची गाडी सुसाट वेगानं पळतेय. भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान यांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर आज पाकिस्तानचे फलंदाज नामिबियाची धुळधाण उडवत आहेत. कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) ही जोडी तर भलत्याच फॉर्मात आहे आणि त्यांनी आज नामिबियाविरुद्ध अनेक विक्रम केले.

बाबरनं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. यूएईत आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला यश मिळाल्याचे प्रमाण फार कमी आहे. तरीही उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी बाबरनं हा निर्णय घेऊन संघाला त्यासाठीही तयार राहण्यास सांगितले. सुरुवातीला संयमी खेळ केल्यानंतर बाबर-रिझवान जोडी सुसाट सुटली.

बाबर व रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम मोडले. कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १००० धावांची भागीदारी करणारी ही पहिलीच जोडी ठरली. जगातील कोणत्याच जोडीला हा विश्वविक्रम करता आलेला नाही.

बाबरनं ४९ चेंडूंत ७ चौकारांसह ७० धावा केल्या. रिझवानही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे आणि कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ९०० धावा करणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला.

बाबरनं आज कर्णधार म्हणून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १४ वे अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानं विराट कोहलीच्या १३ अर्धशतकांच्या विक्रमासह आरोन फिंच ( ११) व केन विलियम्सन ( ११) यांनाही मागे टाकले.

कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ७ अर्धशतकी भागीदारी करणारे बाबर व रिझवान ही पहिलीच जोडी ठरली. यापूर्वी २०१६मध्ये मार्टीन गुप्तील व केन विलियम्सन यांनी ६ वेळा ५०+ भागीदारी केली होती.

बाबर-रिझवान या जोडीनं ट्वेंटी-२०त कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विक्रम करताना एबी डिव्हिलियर्स- विराट कोहली यांनी २०१६मध्ये केलेल्या ९३९ धावांचा विक्रम मोडला. २०१९मध्ये सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर यांनी ९०८ धावांची भागीदारी केली होती.

बाबर आजम-मोहम्मद रिझवान यांनी ट्वेंटी-२०त पाचव्यांदा शतकी भागीदारी केली आणि आतापर्यंत पाच शतकी भागीदारी कोणालाच करता आली नव्हती. रोहित शर्मा व शिखर धवन आणि मार्टिन गुप्तील व केन विलियम्सन यांनी प्रत्येकी ४ शतकी भागीदारी केल्या आहेत.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बाबरनं आतापर्यंत ३ वेळा ५०+ धावा केल्या आहेत . त्यानं शोएब मलिक ( २००७), ख्रिस गेल ( २००९), कुमार संगकारा ( २००९) आणि असघर अफघान ( २०१६) यांचा प्रत्येकी २ अर्धशतकी+ धावांचा विक्रम मोडला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील पहिल्या ६० डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्येही बाबरनं आघाडी घेतली. त्यानं २४०२ धावा केल्या आहेत, तर विराटच्या नावावर २१६७ धावा आहेत.

बाबर ७० धावांवर माघारी परतल्यानंतर मोहम्मद रिझवाननं फटकेबाजी केली आणि त्याला मोहम्मद हाफिजची साथ मिळाली. पाकिस्ताननं पहिल्या १० षटकांत बिनबाद ५९ धावा केल्या होत्या आणि अखेरच्या ६० चेंडूंत त्यांनी १३० धावा चोपल्या. रिझवाननं ५० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारासह नाबाद ७९ धावा केल्या. हाफिजनं १६ चेंडूंत नाबाद ३२ धावा चोपल्या. पाकिस्ताननं २ बाद १८९ धावा केल्या.