Join us  

हार्दिक, सूर्यकुमार, इशान यांच्यापैकी एकाला डच्चू मिळणार; तगडा फलंदाज वर्ल्ड कप संघात दाखल होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 4:53 PM

Open in App
1 / 7

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या टीम इंडियाच्या ताफ्यातील सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या व इशान किशन यांचा आयपीएल २०२१मधील फॉर्म हा बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अष्टपैलू हार्दिक हा पूर्णपणे तंदुरूस्तही दिसत नाही. तरीही त्याची निवड केल्यानं अनेकांनी टीका केली आहे.

2 / 7

आता १० ऑक्टोबरपर्यंत देशांना त्यांच्या वर्ल्ड कप संघात बदल करता येणार आहे आणि बीसीसीआयही अंतिम संघात बदल करेल, अशी शक्यता बळावली आहे. अशात आता श्रेयस अय्यरचं ( Shreyas Iyer) नाव पुढे येत आहे. InsideSport नं दिलेल्या वृत्तानुसार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात अय्यरचा समावेश करण्याचा विचार बीसीसीआयनं सुरू केला आहे.

3 / 7

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात खेळणारे सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि राहुल चहर यांनी नुकतेच टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या संघात पदार्पण केले. त्यानंतर या तिघांची वर्ल्ड कप साठीच्या संघातही निवड झाली, परंतु आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे इशान किशनला पर्याय म्हणून श्रेयस अय्यरच्या नावाचा विचार सुरू झाला आहे, परंतु हार्दिक पांड्या संघात कायम राहिल.

4 / 7

''या खेळाडूंचा फॉर्म ही चिंतेची बाब नक्की आहे, परंतु अजून आयपीएलचे काही सामने शिल्लक आहेत आणि त्यांना कमबॅक करण्याची संधी आहे. आशा करतो की ते यशस्वी होतील. सूर्यकुमार यादवनं टीम इंडियासाठी धावा केल्या आहेत आणि त्याचा फॉर्मचा जास्त विचार करण्याची गरज नाही. श्रीलंका दौऱ्यावर इशान किशननं चांगली कामगिरी केली होती. विराटनंही मागील सामन्यानंतर त्याच्याशी चर्चा केली, बघू काय फरक पडतो,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी InsideSport ला सांगितले.

5 / 7

ते पुढे म्हणाले,''जर चिंता अधिक वाढली, तर आम्ही श्रेयस अय्यर हा आमच्याकडे बॅकअप म्हणून आहेच. त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो, परंतु याबाबच आताच दाव्यानं सांगणं घाईचं ठरेल. इशान किशन हा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे आत्ताच अंदाज व्यक्त करण्यात अर्थ नाही.''

6 / 7

''हार्दिकची फिटनेस सुधारत आहे आणि मुंबई इंडियन्स त्याच्यावरील वर्कलोड योग्यरितीनं हाताळत आहेत. तो नेट्समध्ये गोलंदाजी करत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यासोबत रोहित आहेच आणि त्याला माहित्येय अशी परिस्थिती कशी हाताळायची. हार्दिकसाठी अद्यापतरी बॅकअप खेळाडूचा विचार केला गेलेला नाही. शार्दूल ठाकूर व दीपक चहर हे राखीव खेळाडूंमध्ये चांगले पर्याय आहेत,''असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

7 / 7

''निवड समितीनं आम्हाला चांगला संघ दिला आहे आणि कागदावर हा संघ मजबूत वाटत आहे. खेळाडूंना चढ-उतारांमधून जावं लागतं. विराटच्या बॅटीतूनही धावा आटल्या होत्या, परंतु त्यानं आता सलग दोन अर्धशतकं झळकावली. आयपीएलनंतर निवड समिती निर्णय घेतील. तीन राखीव खेळाडू आहेतच आणि त्यानुसारच संघ व्यवस्थापन निर्णय घेईल,''असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१हार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादवइशान किशनबीसीसीआय
Open in App