इंग्लंडनं Group 1 मध्ये विजयाचा चौकार मारताना ८ गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान पक्कं केलं. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तो पहिला संघ ठरला. सोमवारी झालेल्या लढतीत त्यांनी श्रीलंकेवर २६ धावांनी विजय मिळवला.
भारत-न्यूझीलंड सामन्यात विराट अँड कंपनीची जी अवस्था झाली होती, तशीच अवस्था आज इंग्लंडची होती. नाणेफेकीचा कौल विरोधात केला, ३६ धावांत ३ फलंदाज माघारी परतले, तरीही इंग्लंडचा संघ खचला नाही. फॉर्माशी झगडणार कर्णधार इयॉन मॉर्गननं संयमी खेळ करताना जॉस बटलरला साथ दिली. या दोघांच्या शतकी भागीदारीनं इंग्लंडनं ४ बाद १६३ धावा केल्या.
आतापर्यंत टॉस जिंकणारा संघ जिंकतो हे समीकरणही इंग्लंडनं बदलून टाकलं. अखेरच्या ५ षटकांत श्रीलंका बाजी मारेल अशीच परिस्थिती होती, तरीही मॉर्गननं त्याच्या गोलंदाजांचा कल्पकतेनं वापर केला. मोईन अलीची दोन षटकं शिल्लक असताना १७वे षटक लिएल लिव्हिंगस्टनला दिले. पहिल्या चार चेंडूंवर ०, १, १ ४ अशा धावा दिल्यानंतर लिव्हिंगस्टननं इंग्लंडला यश मिळवून दिलं. लिव्हिंगस्टननं त्या षटकात ७ धावा दिल्या व १ विकेट घेतली.
पुढच्या षटकात शनाका ( २६) धावबाद झाला अन् श्रीलंकेनं तिथंच सामना गमावला. ख्रिस जॉर्डनच्या त्या षटकात दुष्मंथा चमिरा ( ४) झेलबाद झाला. श्रीलंकेला १२ चेंडूंत ३० धावा करायच्या होत्या. मोईन अलीनं १९व्या षटकात दोन विकेट्स घेत श्रीलंकेचा डाव १३७ धावांवर गुंडाळला. इंग्लंडनं २६ धावांनी हा सामना जिंकला. इयॉन मॉर्गनचा हा कर्णधार म्हणून ट्वेंटी-२०तील ४३वा विजय ठरला. यासह त्यानं महेंद्रसिंग धोनी व असघर अफघान यांचा ४२ विजयांचा विक्रम मोडला.
इंग्लंडनं ग्रुप १ मधून उपांत्य फेरीत स्थान पक्के केले असले तरी दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया शर्यतीत आहेत. आफ्रिका ४ गुण व ०.२१० नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यांना उर्वरित सामन्यांत बांगलादेश व इंग्लंडचा सामना करायचा आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यातही ४ गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट -०.६२७ असा असल्यानं त्यांना उर्वरित सामन्यांत बांगलादेश व वेस्ट इंडिजवर मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल. बांगलादेश व वेस्ट इंडिज दोन्ही संघांना घातक ठरू शकतात.
ग्रुप १ मध्ये इंग्लंडचे अव्वल स्थान पक्के आहे आणि त्यांच्यासमोर उपांत्य फेरीत ग्रुप २ मधील दुसऱ्या क्रमांकावरील संघाचे आव्हान असणार आहे. या गटात पाकिस्तान अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले असले तरी अफगाणिस्तानच्या करिष्म्यावर त्यांच्या आशा जीवंत आहेत. चमत्कार झाल्यात टीम इंडिया ग्रुप २ मधून दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश मिळवू शकते आणि त्यांचा सामना इंग्लंडशी होऊ शकतो.