T20 World Cup, ZIM vs BAN : बांगलादेशचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये गेले, अम्पायरने No Ball देत सर्वांना पुन्हा बोलावले; वाचा नेमकं काय झालं

T20 World Cup, BANGLADESH V ZIMBABWE : झिम्बाब्वे अन् थरार हे सोबतच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दाखल झालेत, असे दिसतेय. पाकिस्तानसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्धीला १ धावेने हार पत्करण्यात झिम्बाब्वेने भाग पाडून धक्कादायक निकाल नोंदवला. त्यानंतर आज बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही रोमांच दिसला.

झिम्बाब्वे अन् थरार हे सोबतच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दाखल झालेत, असे दिसतेय. पाकिस्तानसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्धीला १ धावेने हार पत्करण्यात झिम्बाब्वेने भाग पाडून धक्कादायक निकाल नोंदवला. त्यानंतर आज बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही रोमांच दिसला.

१ चेंडूंत ५ धावा हव्या असताना मोसाडेक होसैनने चेंडू निर्धाव टाकला अन् यष्टिरक्षक नुरूल हसनने स्टम्पिंग करून ब्लेसिंग मुझाराबानीला बाद केले आणि बांगलादेशच्या खेळाडूंनी विजयी जल्लोष केला. सर्व खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये परतले, बांगलादेशचे समर्थक नाचताना दिसले.

मात्र, नाट्यमय कलाटणी मिळाली. अम्पायरने No Ball असल्याचे जाहीर करत खेळाडूंना पुन्हा मैदानावर बोलावले अन् आता झिम्बाब्वेला १ चेंडूंत ४ धावाच करायच्या होत्या. मग काय घडलं.. चला जाणून घेऊया...

सौम्या सरकार ( ०) व लिटन दास ( १४) या दोन अनुभवी फलंदाजांना माघारी पाठवून झिम्बाब्वेने सुरुवात तर चांगली केली. पण, नजमूल शांतो व शाकिब अल हसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करून बांगलादेशची गाडी रुळावर आणली.

आफिफ होसैनने जोरदार फटकेबाजी करताना १९ चेंडूंत २९ धावा केल्या. शांतो ५५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ७१ धावांवर बाद झाला. २०व्या षटकात तीन विकेट्स गमावल्यानं बांगलादेशला ७ बाद १५० धावांवर समाधान मानावे लागले. रिचर्ड एनगारावा ( २-२४) व ब्लेसिंग मुझाराबानी ( २-१३) यांच्यासह सिकंदर रजा व सीन विलियम्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

वेस्ली माधेव्हेरे ( ४) व क्रेग एर्व्हीन ( ८) माघारी परतल्यानंतर मिल्टन शुम्बा व सिन विलियम्स डाव सावरतील असे दिसत होते. पण, मुस्ताफिजूर रहमानने त्याच्या पहिल्याच षटकात शुम्बाला ( ८) बाद केले. सिंकदर रजा ( ०) व रेगीस चकाब्वा ( १५) हेही माघारी परतल्याने झिम्बाब्वेची अवस्था ५ बाद ६९ अशी झाली.

सिन विलियम्स व रायन बर्ल यांनी ४३ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करताना झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशा कायम राखल्या होत्या. तस्कीन अहमदने ४-१-१९-३ , मुस्ताफिजूर रहमानने १५ धावांत २ विकेट्स घेतल्या. झिम्बाब्वेला १२ चेंडूंत २६ धावा करायच्या होत्या.

बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकिबने १९व्या षटकात सामन्याला कलाटणी दिली. पहिल्या तीन चेंडूंवर ७ धावा आल्यानंतर चौथ्या चेंडूवर अविश्वसनीय क्षेत्ररक्षण करताना विलियम्सला रन आऊट केले. विलियम्सन ४२ चेंडूंत ८ चौकारांसह ६४ धावांवर बाद झाला.

झिम्बाब्वेला ६ चेंडूंत १६ धावा करायच्या होत्या. रिचर्डन एनगारावाने येताच चौकार-षटकार खेचला. पण, ३ चेंडूंत तो १० धावा करून बाद झाला.

१ चेंडू ५ धावा हव्या असताना अखेरचा चेंडू निर्धाव पडला अन् बांगलादेशने विजयाचा आनंद साजरा केला. पण, बांगलादेशच्या यष्टीरक्षकाने चेंडू स्टम्प्सच्या पुढे पकडला अन् नो बॉल दिला गेला. त्यामुळे खेळाडूंना पुन्हा मैदानावर बोलावले गेले, पण बांगलादेशने फ्री हिटचा चेंडू निर्धाव ठेवण्यात यश मिळवले अन् ३ धावांनी सामना जिंकला.