Changes in Team India, IND vs WI 3rd T20 : तिसऱ्या टी२० साठी कोहली, पंतला सुट्टी; टीम इंडियात दिसणार ३ महत्त्वाचे बदल

दुसऱ्या सामन्यात विराट, पंत दोघांनीही ठोकली होती अर्धशतके

भारताने वेस्ट इंडिजविरूद्धचे पहिले दोन टी२० सामने जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. त्यामुळे तिसरा सामना ही निव्वळ औपचारिकता असणार आहे.

दुसऱ्या टी२० मध्ये रोहित, इशान आणि सूर्यकुमार अपयशी ठरल्यावर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनीच दमदार अर्धशतकं ठोकत संघाला १८६ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यामुळे भारताने सामना व मालिका जिंकली.

पण आता टी२० मालिका जिंकल्यामुळे तिसऱ्या टी२० साठी विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघात काही बदल अपेक्षित आहेत. सध्याची संघबांधणी पाहता आजच्या सामन्यासाठी संघात ३ महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात.

भारतीय संघाने दुसऱ्या टी२० सामन्यात १८६ धावा करूनही यजमानांना निसटता ८ धावांनी विजय मिळाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने विजय खेचून आणला.

अशा परिस्थितीत भारतीय संघ मालिका जिंकलेला असताना संघाची बेंच स्ट्रेन्थ म्हणजेच संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना तपासून पाहण्याची उत्तम संधी भारतीय संघ व्यवस्थापनाकडे आहे.

सर्वप्रथम ऋषभ पंत संघातून बाहेर गेल्याने त्याच्या जागी इशान किशन यष्टीरक्षण करेल हे उघडच आहेत. संघात सध्याच्या घडीला इशान किशन वगळता इतर कोणीही किपर नाही. अशा वेळी महत्त्वाचे तीन बदल पुढीप्रमाणे असू शकतील.

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) - इशान गेल्या दोन सामन्यात सलामीला फारसा चांगला न खेळल्याने त्याला पंतच्या जागी मधल्या फळीत फलंदाजी दिली जाऊ शकते. अशा वेळी सलामीसाठी ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. IPL आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धा त्याने गाजवली होती.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) - भारताचा मधल्या फळीतील दमदार फलंदाज श्रेयस अय्यर याला आजच्या सामन्यासाठी संघात स्थान मिळू शकते. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विराट कोहली संघात नसल्याने सूर्यकुमार ३ आणि श्रेयस अय्यर ४ नंबरवर फलंदाजी करताना दिसू शकतो.

आवेश खान (Avesh Khan) - दीपक चहर आणि हर्षल पटेल या दोन गोलंदाजांची दुसऱ्या टी२० सामन्यात जोरदार धुलाई झाली. त्यामुळे आता त्या दौघांपैकी एकाच्या जागेवर आवेश खानला संघात स्थान देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेऊ शकते.