"भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची लाज काढली तेव्हापासून..."; रमीझ राजा संतापला

Ramiz Raja, IND vs PAK: बांगलादेशने पाकिस्तानचा १० गडी राखून केला ऐतिहासिक पराभव

Ramiz Raja, IND vs PAK: पाकिस्तानी संघाला बांगलादेशविरूद्ध लाजिरवाण्या कसोटी पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या डावात आघाडी घेऊनही पाकिस्तानला बांगलादेशने १० गडी राखून हरवले आणि पहिल्यांदाच कसोटी जिंकत इतिहास रचला.

शेवटच्या डावात पाकिस्तानने बांगलादेशला अवघ्या ३० धावांचे आव्हान दिले होते. ते त्यांनी सहज गाठले. पाकिस्तानच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकचा माजी क्रिकेटर रमीझ राजा याने संघावर बोचऱ्या शब्दांत टीका केली.

"सर्वप्रथम संघनिवडीतच चुका होत्या. संघात स्पिनर नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या वेगवान गोलंदाजांची जी दहशत होते ती आता संपून गेली आहे. आपल्या गोलंदाजांना स्वत:वर विश्वासच उरलेला नाही," असे राजा म्हणाला.

"आशिया कपमध्ये भारतीय फलंदाजांनी जेव्हा वेगवान पिचवर आपल्या गोलंदाजांची धुलाई केली होती त्याच वेळी आपल्या फास्ट बॉलर्सची दहशत संपुष्टात आली होती. त्यांनी आपल्या गोलंदाजांची अब्रू चव्हाट्यावर आणली."

"भारतीय फलंदाजांनी जेव्हा आपली धुलाई केली त्यावेळीच इतर संघांना कळलं की पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसमोर आक्रमकपणे खेळलो तर त्यांची गोलंदाजी निष्प्रभ ठरते. परिणामी आपले गोलंदाजांचा वेग कमी झाला आणि गोलंदाजीची धारदेखील कमी झाली," असे रमीझ राजा म्हणाला.