रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवून ऐतिहासिक कामगिरी करताना ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. विश्वचषकाची ट्रॉफी मोठ्या कालावधीनंतर भारतात आल्याने तमाम भारतीयांनी एकच जल्लोष केला.
बुधवारी भारताच्या वन डे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शनासाठी घेतले.
यावेळी विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन ही मंडळी उपस्थित होती. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
२९ जून रोजी अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला आणि इतिहासात दुसऱ्यांदा क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये विश्वविजेते होण्याचा मान मिळवला.
त्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रवींद्र जडेजानेही या फॉरमॅटला अलविदा केला.
रोहित शर्मा हा कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला.