Team India Cricket: वर्ल्ड कप 2023 पर्यंत टीम इंडिया फूल बिझी; असे आहे वर्षभराचे वेळापत्रक, पाहा...

Team India Cricket : नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टेस्ट सीरिज पार पडली, यानंतर आता लगेच IPL सुरू होत आहे.

Team India Schedule : या वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघ अनेक देशांविरोधात द्विपक्षीय सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या वेळापत्रकाबाबत एक रिपोर्ट समोर आली आहे, ज्यानुसार आगामी विश्वचषकापूर्वी भारताला आशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धेसह दोन देशांचा दौरा करायचा आहे.

याशिवाय भारत ऑस्ट्रेलियासह अन्य देशाचे यजमानपदही भूषवू शकतो. सध्या सर्व भारतीय खेळाडू आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहेत. या स्पर्धेनंतर लगेचच टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही खेळायचा आहे. WTC विजेतेपदाचा सामना लंडनमध्ये 7 जूनपासून खेळवला जाणार आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, IPL आणि WTC फायनलनंतर लगेचच बीसीसीआय श्रीलंका किंवा अफगाणिस्तानसोबत तीन सामन्यांची होम सीरिज आयोजित करण्याची तयारी करत आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जर असे घडले, तर ही तीन सामन्यांची मालिका जून महिन्यात खेळवली जाईल.

यानंतर टीम इंडियाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात वेस्ट इंडिज आणि आयर्लंडचा दौरा करायचा आहे. वेस्ट इंडिजच्या वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यावर यापूर्वी टीम इंडियाला तीन वनडे आणि टी-20 सामन्यांसह दोन कसोटी सामने खेळायचे होते, परंतु रिपोर्टनुसार आता या दौऱ्यावर भारताला दोन अतिरिक्त टी-20 सामने खेळावे लागणार आहेत. याचा अर्थ भारत आता वेस्ट इंडिजविरुद्ध 8 ऐवजी 10 सामने खेळणार आहे. यानंतर टीम इंडियाला आयर्लंडचा दौरा करायचा आहे.

या दोन देशांच्या दौऱ्यानंतर टीम इंडिया सप्टेंबरमध्ये आशिया कप खेळणार असून, त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक 2023 च्या आधी ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल - जूनमध्ये, श्रीलंका किंवा अफगाणिस्तान - जूनमध्ये, वेस्ट इंडिज दौरा - जुलैमध्ये, आयर्लंड दौरा - ऑगस्टमध्ये, आशिया कप 2023 - सप्टेंबरमध्ये, ऑस्ट्रेलिया यजमान - सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये, विश्वचषक 2023 – ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये.