MS Dhoni : एमएस धोनीने ‘या’ २ गोष्टींशी कधीही तडजोड केली नाही, माजी फिल्डिंग कोचचा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी भारतीय क्रिकेटच्या सुधारणेसाठी केलेल्या बदलांना जबाबदार आहे, असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी भारतीय क्रिकेटच्या सुधारणेसाठी केलेल्या बदलांना जबाबदार आहे. कर्णधार म्हणून त्याने कायमच संघाला सर्वोच्च ठेवले. धोनीने २००७ मध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले आणि तेव्हापासून भारतीय क्रिकेटने पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

एमएस धोनीच्या त्च्नेतृत्वाखाली, भारताने T20 विश्वचषक, ५० षटकांचा विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तीनही प्रमुख आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताला पहिल्या क्रमांकावरही पोहोचवलं.

महेंद्रसिंग धोनीने अनेक धाडसी निर्णयही घेतले, काही निर्णयांनी भारतीय क्रिकेटचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला. त्याने रोहित शर्माला एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीला उतरण्याची संधी दिली आणि विराट कोहलीला त्याच्या पहिल्या काही कसोटींमध्ये अपयश आले तरीही त्याला पाठिंबा दिला.

धोनीचे हे निर्णय कसे ठरले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याचवेळी टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी सांगितले की एमएस धोनीने कधीही तडजोड केली नाही आणि दोन गोष्टी कधीही करू दिल्या नाहीत.

वर्षानुवर्षे भारतीय क्रिकेट फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी ओळखले जात होते. परंतु धोनीच्या नेतृत्वाखाली क्षेत्ररक्षण आणि फिटनेसकडे समान लक्ष आणि महत्त्व प्राप्त झाले. धोनी कर्णधार असताना २०१४ मध्ये संघाचा भाग बनलेले भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी यासंदर्भातील एक आठवण सांगितली. धोनीने स्पष्ट केले होते की अशी दोन क्षेत्रे आहेत जिथे आत्मसंतुष्ट राहण्याला जागा नाही, असे ते म्हणाले. क्रिकेट डॉट कॉमला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केले.

जेव्हा धोनी कर्णधार होता, तेव्हा त्यानं क्षेत्ररक्षणाचं नेतृत्व केलं. याशिवाय त्याचं रनिंग बिटविन द विकेट्स हे माझ्यासाठी निराळंच होतं. फिल्डिंग आणि रनिंग बिटविन द विकेट यात मी तडजोड करू शकत नाही, असे त्याने मला सांगितले होते. हे सत्यही आहे. ज्या प्रकारे त्याने क्षेत्ररक्षणाला प्राधान्य दिले, विराटने तोच वारसा पुढे नेला. रवी शास्त्रींनीही कायमच आपले ११ सर्वोत्कृष्ठ खेळाडू खेळतील असे म्हटले होते, असे श्रीधर यांनी सांगितले.

“उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि मोहित शर्मा यांच्यासह मी काही उत्तम फिल्डिंग सेशन्स केले आहेत. ते एक उत्तम गोलंदाजासोबत उत्तम फिल्डर्सही होते. याशिवाय तुम्ही विराट, रविंद्र जडेजा, मनिष पांडे यांनाही पाहिले असेल. त्यांचं क्षेत्ररक्षण पाहिले असेल. चहल, कुलदीप, केदार यांच्यासारख्या खेळाडूंनी आपल्या कौशल्यावर अधिक मेहनत केली आहे. त्यांच्यासोबत काम करताना मला खुप आनंद मिळाला,” असेही श्रीधर यांनी स्पष्ट केले.