Join us  

बड्या बड्या बाता आणि...! भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात; जाणून घ्या कारणे, चाहते संतप्त

By ओमकार संकपाळ | Published: October 15, 2024 1:38 PM

Open in App
1 / 11

भारतीय महिला संघातील खेळाडूंनी विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी अनेकदा 'है तय्यार हम'चा नारा देत तमाम भारतीयांना आशा दाखवली. कर्णधार हरमनप्रीत कौरपासून ते उपकर्णधार स्मृती मानधनाने आपल्या पुरुष संघाच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले. पण, सलामीच्या सामन्यापासूनच भारताला धक्का बसण्यास सुरुवात झाली.

2 / 11

स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून टीम इंडियाकडे पाहणाऱ्या अतिउत्साही चाहत्यांना पहिल्याच सामन्यात चपराक बसली. मागील कित्येक सामने हरणाऱ्या न्यूझीलंडने भारताविरुद्ध विजय मिळवून आपल्या लाजिरवाण्या कामगिरीला ब्रेक लावला. प्रतिस्पर्धी संघाने दिलेल्या १६१ धावांच्या आव्हानापर्यंत पोहोचताना टीम इंडिया अवघ्या १०२ धावांत गारद झाली.

3 / 11

कोणत्याच फलंदाजाला विश्वचषकासारख्या स्पर्धेत साजेशी खेळी करता आली नाही. मग पुढच्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेला नमवून भारताने आशियातील आपला दबदबा कायम ठेवला... दबदबा तरी कसा म्हणावा कारण अलीकडेच भारताला आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पराभूत केले होते. इथे भारताला अतिआत्मविश्वास नडला हे स्पष्ट होते.

4 / 11

मोठी आश्वासने, कधी अतिआत्मविश्वास तर कधी आत्मविश्वासाची कमी यामुळे भारताचा गड ढासळत गेला. यंदाच्या विश्वचषकात देखील हेच चित्र पाहायला मिळाले. अखेर अशी वेळ आली की, टीम इंडियाचे भवितव्य पाकिस्तानसारख्या फुसक्या संघाला ठरवावे लागले. न्यूझीलंडने पाकिस्तानचा देखील दारुण पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला अन् भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

5 / 11

भारत स्पर्धेबाहेर होताच चाहत्यांसह नेटकऱ्यांनी हरमनप्रीत कौरच्या संघावर तोंडसुख घेतले. साहजिकच भारताला या स्पर्धेत एकदाही ट्रॉफी जिंकता आली नाही. भारताच्या पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे सर्व सोयीसुविधा, मानधन, प्रसिद्धी आणि चाहत्यांची साथ असताना देखील सातत्याने टीम इंडिया मोठ्या व्यासपीठावर अपयशी ठरली.

6 / 11

भारताला न्यूझीलंडकडून ५८ तर ऑस्ट्रेलियाकडून ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. २००९ च्या विश्वचषकापासून भारतीय संघाची कामगिरी पाहिली तर यंदा टीम इंडियाने लाजिरवाणी खेळी केली. टीम इंडियाने आतापर्यंत चारवेळा उपांत्य फेरी गाठली आहे, तर २०२० मध्ये अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

7 / 11

भारताने पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभवाची धूळ चारल्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाची झळ काहीशी कमी झाली. पण त्यानंतर अखेरच्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या आत्मविश्वासाची कमी ओळखली आणि पुन्हा एकदा निसटता विजय मिळवला.

8 / 11

राष्ट्रकुल स्पर्धा, द्विपक्षीय मालिका, विश्वचषक असो की मग इतर कोणतीही स्पर्धा... ऑस्ट्रेलियाने नेहमीच भारतीय खेळाडूंना शांत ठेवले. आशियाई संघ वगळता टीम इंडिया इतर संघांविरुद्ध निर्भयपणे का खेळू शकत नाही या प्रश्नाला आता जागा आहे. एक नाही तर कित्येकदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये याची प्रचिती आली आहे.

9 / 11

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने अखेरपर्यंत संघर्ष केला. तिने अर्धशतकी खेळी केली खरी पण या संथ खेळीने प्रतिस्पर्धी संघाचाच फायदा झाला. ऑस्ट्रेलियासारख्या संघासमोर इतर कोणत्याच भारतीय फलंदाजाचा निभाव लागत नव्हता. हे जाणून असलेली अनुभवी हरमन मात्र आक्रमक खेळ करण्यात चुकली.

10 / 11

अखेर भारताला नऊ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने धावगतीवर सर्व गणित अवलंबून होते... त्यात जर पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला असता तरच हे शक्य होते. पण, पाकिस्तानने आपली परंपरा कायम राखताना दारुण पराभव स्वीकारला आणि न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला.

11 / 11

आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि तेही विश्वचषकाच्या सामन्यात एखादा संघ तब्बल आठ झेल सोडतो हे दुर्मिळ... पण पाकिस्तानी संघाने ही किमया साधली अन् त्यांच्या चाहत्यांसह भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळले. भारत असलेल्या गटातून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. उर्वरीत पाकिस्तान, भारत आणि श्रीलंका या आशियाई संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघहरनमप्रीत कौरस्मृती मानधनाभारतीय क्रिकेट संघ