अमरावतीत जन्मलेल्या Team India च्या खेळाडूची नवी इनिंग; फोटो शेअर करत दिली खुशखबर

जितेशचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात झाला.

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याचा साखरपुडा झाला असून, त्याची झलक जितेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. शलाका मकेश्वर आणि जितेश लवकरच सातफेरे घेणार आहेत.

आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी खेळणाऱ्या जितेशचे भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिनंदन केले. आयपीएल २०२४ पासून जितेश क्रिकेटमध्ये फार सक्रिय दिसला नाही. त्याला भारताच्या विश्वचषकाच्या संघातून वगळण्यात आले. मग तो विदर्भाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळू लागला.

सूर्यकुमार यादव, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड यांसारख्या भारतीय खेळाडूंनी जितेशला कमेंटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

जितेशचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात झाला. जितेशचे वडील मूळचे हिमाचल प्रदेशातल्या कांगडा जिल्ह्यातले आणि आई अमरावती येथील. जितेश आणि नितेश या दोन्ही भावांचा जन्म अमरावतीतच झाला. त्यांचे वडील सोळाव्या वर्षापासून अमरावतीतच राहत होते आणि त्यांचा व्यवसाय होता, अशी माहिती नितेशने एका मुलाखतीत दिली होती.

२०१६ मध्ये जितेश शर्मा मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता. मात्र २०१८ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज केले आणि त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. २०१८ नंतर त्याला कोणत्याही फ्रँचायझीने मूळ किमतीत देखील विकत घेतले नाही. त्यामुळे जितेश निराश झाला होता. मग लिलावात पंजाब किंग्जने त्याला २० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी करून खेळण्याची संधी दिली.