मीरपूर कसोटीत बांगलादेशवर रोमांचक विजय मिळवत भारतीय संघाने २०२२ या वर्षाचा शेवट गोड केला. आता २०२३ मध्ये टीम इंडिया नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. अपवाद वगळता सरते वर्ष भारतीय संघासाठी तितकेसे खास राहिलेले नाही. त्यामुळे नव्या वर्षांत क्रिकेटप्रेमींना भारतीय संघाची कामगिरी उंचावण्याची अपेक्षा असेल. या नव्या वर्षात संघासमोर ५ प्रमुख आव्हाने असतील ती पुढीलप्रमाणे.
भारतीय संघाला २०२१ मध्ये झालेल्या पहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पराभव पत्करावा लागला होता. यावर्षीही भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी शर्यतीत आहे. जर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील ४ पैकी ३ सामने जिंकले तर भारतीय संघाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होईल. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जून महिन्यात ओव्हलवर खेळवला जाणार आहे.
भारताने २००७ मध्ये पहिल्याच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तेव्हापासून भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकलेला नाही. सन २०२१ आणि २०२२च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेनुरूप झाली नव्हती. अशा परिस्थितीत भारतीय टी-२० संघामध्ये आमुलाग्र बदल करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. तसेच टी-२० साठी वेगळा प्रशिक्षक आणि कर्णधार नेमण्याची तयारी सुरू आहे. तसेच काही सिनियर खेळाडूंच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्याचाही विचार आहे.
पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित होणार आहे. १२ वर्षांनंतर ही स्पर्धा भारतात आयोजित होत आहे. २०११ मध्ये भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. त्यातच २०१३ मध्ये जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. आता २०२३ मध्ये हा दुष्काळ संपवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
विराट कोहली, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांचं वय ३० वर्षांहून अधिक झालं आहे. कोहली-रोहित, भुवनेश्वर कुमार आणि शमी यांनी सलग दोन टी-२० वर्ल्डकप खेळले होते. तर जडेजा दुखापतीमुळे २०२२ चा वर्ल्डकप खेळू शकला नव्हता. त्यामुळे ज्येष्ठ खेळाडूंबाबतच्या भवितव्याबाबत नव्या वर्षात बीसीसीआय निर्णय घेण्याची शक्यता आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धा रंगणार आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय संघासाठी ही मालिका महत्त्वपूर्ण आहे. भारतीय संघाने २००४ नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात कसोटी मालिका गमावलेली नाही. मात्र सध्य ऑस्ट्रेलियन संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका रंगतदार होण्याची शक्यता आहे.